Ajit Pawar : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. त्यानंतर पिंपरीतील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
या सर्व प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. अजित पवारांनी या प्रकरणाचा संबंध थेट राज्यपालांशी जोडला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यपालांनी अनेक अपमानास्पद वक्तव्य केली आहेत.
अजित पवार म्हणाले की, शाई फेकणाऱ्या तरुणावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र, राज्यात महापुरुषांचा आणि स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांवर कोणताही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही, असे म्हणत प्रश्न उपस्थित केला आहे.
तसेच, कोणावरही शाई फेकणे चुकीचे आहे. मी त्याचे समर्थन करत नाही. पण चंद्रकांत पाटील यांनी शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या निधीवरुन भीक मागा अशी सूचना केली, ती चुकीची आहे, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पिंपरी चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली. शाई फेकीच्या प्रकरणानंतर पोलिसांवर कोणतीही कारवाई करू नका, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. परंतु, त्यांनतर 10 पोलिसांवर या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज बरकडेने शाईफेक केली होती. त्यानंतर शाईफेक करणाऱ्या मनोजला लवकरच पैसे दिले जातील याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. त्यामुळे आता बारामती पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून 14 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या –