Share

भर लग्नातच भाजप-शिंदेगट भिडले, एकमेकांना खुन्नस देत तुफान राडा; गाड्या फोडल्या, दगडफेक, रास्ता रोको

अहमदनगर : राज्यात एकत्र सत्ता असलेल्या आणि लोकसभेतही एकत्र येण्याची चर्चा असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये अहमदनगरमध्ये प्रचंड राडा झाला. एका लग्न समारंभात या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना भिडले.

त्यांनी शहरातील केडगाव येथे येऊन हॉटेल्सवर दगडफेक केला. नंतर दुसऱ्या गटाने रास्ता रोको केला. या राजकीय आखाड्यामुळे रात्री काही काळ नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्राथमिक माहितीनुसार, नगर तालुक्यातील एका गावात एका नेत्याच्या लग्न समारंभाला राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले आणि बाळासाहेबांचे शिवसेना पक्षप्रमुख दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते हे उपस्थित होते. तेथे त्यांच्यात वाद झाला.

त्यानंतर रात्री कर्डिले गटाच्या समर्थकांनी वाहनातून नगर शहरातील केडगाव गाठले आणि येथील दिलीप सातपुते यांच्या हॉटेल रंगोलीवर दगडफेक केली. त्यांनाही सातपुते गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देत तेही रस्त्यावर उतरले. दगडफेक करणारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सातपुते यांच्या समर्थकांनी म्हणजेच शिंदे गटाने नगर-पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

दगडफेकीत आधी हॉटेलचे आणि नंतर इतर वाहनांचे नुकसान झाले. दगडफेकीमुळे हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके दाखल झाले.

कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले. नगर तालुका, एमआयडीसी, भिंगार कॅम्प पोलीस हे देखील घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. तोपर्यंत कर्डिले गटाचे म्हणजेच भाजपचे समर्थक निघून गेले होते. याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सातपुते गटाचे समर्थक रस्त्यावर बसले.

गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, असे पोलीस सांगत होते. मात्र, सुरुवातीला कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर रात्री उशिरा सर्वांनी तेथून चालत जात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर वातावरण निवळले आणि वाहतूक सुरळीत झाली.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार! शरद पवारांच्या सर्वात विश्वासू नेत्यावर भाजपचे जाळे
पाकिस्तानला हरवून जेमिमाने विराट स्टाईल जल्लोश करताच खेळाडूंनी धावत मारली मिठी; भारताचा सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का! शरद पवारांचा सर्वात जवळचा ‘हा’ नेता भाजपने फोडला

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now