आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील अपार कष्ट करत असतात. मुलांना कुठलीही कमी पडू नये यासाठी ते काहीही करून पैसे उभे करतात. अगदी असंच काहीसं केलं आहे सुनील तोडकर यांनी आपल्या मुलाने कुस्तीपटू व्हावं यासाठी सुनील तोडकर यांनी चक्क 5 एकर जमीन विकली.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलासाठी सुनील तोडकर यांनी आपली जमीन विकली, त्या मुलाने त्यांच्या कष्टाचे व त्यागाचे चीज केले आहे. सुनील तोडकर यांचा मुलगा पै. अतिश सुनील तोडकर (Atish Sunil Todkar) याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
बीडमधील साध्या शेतकरी कुटुंबातील अतिशला यशस्वी कुस्तीपटू बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी आपल्या 9 एकर जमिनीपैकी 5 एकर जमीन विकली. अतिशला लहानपणापासून तालमीत घालण्यात आले होते. तो आळंदी येथील दिनेश गुंड यांच्या तालमीत होता.
यानंतर त्याला दिल्ली येथील वीरेंद्र स्पोर्ट्स अकॅडमी येथे होता. त्या ठिकाणी त्याच्या खुराकासाठी येणारा खर्च भागवण्यासाठी सुनील तोडकर यांनी जमीन विकायचे ठरवले. पैशाच्या अडचणीवर मात करत सुनील तोडकर यांनी आपल्या मुलाला घडविले आहे.
याचेच फलित म्हणून अतिश महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मानकरी झाला आहे. याआधीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याला रौप्य पदक मिळाले होते. ही राज्य स्पर्धा जिंकल्याने त्याला पदकासह जावा गाडी देखील मिळाली आहे.
अगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मेडल मिळवणे हे अतिशचे ध्येय आहे. तर, आपल्या मुलाने ऑलिम्पिक मध्ये चांगली कामगिरी करून सुवर्णपदक मिळवावे अशी इच्छा सुनील तोडकर यांची आहे. सुनील तोडकर यांनी आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी केलेल्या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या