bjp : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांच्या उभे राहिले आहेत. या निवडणुकीमुळे शिवसेनेच्या दोन्हीही गटातील वाद आता विकोपाला गेल्याच पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतले आहे. तसेच त्यांनी आपले चिन्ह मशाल असे घेतले आहे. तर शिंदे यांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव घेतले आहे. तसेच त्यांचे चिन्ह हे ढाल आणि तलवार असे आहे.
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे.
तसेच याच निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे मैदानात आहेत. पटेल यांनी आज आपला निवडणुकीसाठीचा अर्ज भरला. विशेष बाब म्हणजे मुरजी पटेल यांच्या या शक्तीप्रदर्शनात मराठी अभिनेता प्रथमेश परबही उपस्थित होता. यावेळी बोलताना त्याने राजकीय विषयांना हात घातला आहे.
मिरवणुकीत बोलताना प्रथमेश म्हणाला की, ‘मुरजी काका फक्त माझेच नाही तर या संपूर्ण विभागाचे काका आहेत. ते फक्त माझाच फोन उचलतात असं नाही तर सर्वसामान्यांनीही त्यांना फोन केला तर ते नेहमीच उचलतात. मी जेव्हा चाळीत रहायचो तेव्हाही तिथे पाणी नीट येतंय की नाही ते मुरजी काका आवर्जुन पाहायचे. खूप उपकार आहेत आमच्यावर त्यांचे,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
दरम्यान, ‘काल रात्री मुरजी काकांचा फोन आलेला आणि आज मिरवणुकीत येणार का विचारलं. मी लगेच तयार झालो. या विभागात विचार करणारी माणसं खूप असल्याच देखील यावेळी बोलताना प्रथमेशने सांगितलं. सध्या प्रथमेशच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.






