शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी आणि काही आमदारांनी बंडखोरी केल्यापासून राज्याचे राजकारण तापलेले आहे. बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथील अनेक व्हिडीओ रोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. शिवसेना नेते संजय राऊतही या बंडखोरांवर रोज सडकून टीका करताना दिसत आहेत त्यामुळे काही बंडखोर आमदार संजय राऊतांवर नाराज आहेत.
त्यामध्ये गुलाबराव पाटील यांचही नाव आहे. नुकताच गुलाबराव पाटलांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते संजय राऊतांवर टीका करताना दिसत आहे. ते म्हणत आहेत की, आपल्या सर्वांवर विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. आपल्या पाठीशीही अनेक लोक उभे राहत असल्याचे दिसून येत आहे.
आपण सर्व एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलो आहोत. आपल्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. आपण सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादामुळे या पदापर्यंत पोहोचलो आहोत. पण आमची स्टोरी जर संजय राऊतांनी सांगितली तर 1992 च्या दंगलीत आम्ही तिघं भाऊ आणि माझे वडील जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत कोठे होते माहिती नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुढे त्यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं की, राऊतांनी 47 डिग्री सेल्सियस तापमानात जळगावमध्ये येऊन 35 लग्न लावावीत, मी त्यांना बहाद्दर समजून घेईल. ज्यावेळी रात्री 12 वाजता रक्ताची गरज भासते तेव्हा आमचा मोबाईल कधीच बंद नसतो. कार्यकर्त्यांच्या वेळीप्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत असतो. आपण शिवसेनेचे 39 आमदार आणि 11-12 अपक्ष आमदार असे मिळून त्यांना पुरे आहोत.
त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले, पण शरद पवारांना काही सोडायला तयार नाहीत अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. पुढं ते म्हणाले की, आम्ही त्यांच्यासाठी काहीच केलं नाही का? आम्हाला त्यांच्या आशिर्वादामुळं सर्व काही मिळालं पण त्यात आमचाही काहीतरी त्याग आहे, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
तसेच संजय राऊत म्हणाले होते की, गुलाबराव पाटलांना पानटपरीवर बसवू त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, त्यांना पानटपरीवर चुना कधी लावून जाईल हेसुद्धा कळणार नाही. दरम्यान, आता या तापलेल्या राजकारणात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची एन्ट्री झाली आहे. विरोधी पक्ष भाजपाने केलेली मागणी त्यांनी मान्य केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्याच्या उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंचा पाय खोलात! गाड्यांच्या किंमतीसह शेतजमीन लपवल्याचा आरोप, कोर्टात याचिका दाखल
दुधडी भरून वाहणाऱ्या गंगा नदीत ७० वर्षीय आजींनी घेतली उडी; पुढं जे घडलं ते पाहून थक्क व्हाल
अखेर ठरलंच! देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांकडे केली बहुमत चाचणीची मागणी, सरकार पडण्याची शक्यता
मोठी बातमी! बंडखोरी करणारे २५ आमदार मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता, गुवाहटीतच बनवलाय स्वतंत्र गट