शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 46 आमदारांना घेऊन बंड केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. हाच मुद्दा पकडून विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी एक ट्वीट केले आहे.अशी कशी गेली वाघाची छाती, कारण द्यायचं ‘हिंदुत्त्व’,खरंतर ‘ईडी’ काडीची भीती. ‘गद्दारांना क्षमा नाही’ ऐकलं होतं ठाण्यात, 46 जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात. सर्व मिलीभगत आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
अशी कशी फुटून गेली वाघाची छाती,
कारण द्यायचं 'हिंदुत्व', खरंतर 'ईडी'काडीची भीती.'गद्दारांना क्षमा नाही' ऐकलं होतं ठाण्यात,
४६ जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात.#सर्व_मिलीभगत_आहे— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) June 23, 2022
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार केंद्रातील भाजप सरकारवर तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आहेत. अशातच राजू पाटील यांनी या सर्व घडामोडींवरून शिवसेनेला ईडीची भीती असल्याचा आरोप ट्वीटवरून केला असून त्यांचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे.
राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांना महत्त्व आले होते. राज्यसभा निवडणुकीत राजू पाटील यांनी भाजपला मतदान केले, अशी चर्चा रंगली होती. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप त्यांच्या एका मतासाठी प्रयत्न करत असून या निवडणुकीनिमित्त छोट्या पक्षांचे महत्त्व समजले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आमदारांची नाराजी एकाच दिवसात समोर कशी आली असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकताच या एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते पुढची राजकीय खेळी काय असणार याबाबत संवाद करत आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर गुप्तचर विभागाचे बारीक लक्ष असते. एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबतही गुप्तचर विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली होती. त्यामुळे सर्व काही माहित असताना उद्धव ठाकरे शांत का बसले? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.