कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत गेली तर पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती, त्यामुळे कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले होते. मात्र आता काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा हळूहळू वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले.
उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. तसेच म्हणाले, कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन रुग्णांची संख्या 1 हजारच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध लादण्याची शक्यता आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण हळूहळू वाढत आहेत. गुरुवारी, म्हणजेच 26 मे रोजी राज्यात 500 पेक्षा अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली. तर फक्त मुंबईत 300 चा टप्पा ओलांडला. त्यामुळे कोरोनाची चौथी लाठ येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. कोरोनाची चौथी लाट सप्टेंबर महिन्यात येऊ शकते असे, बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे.
सध्याची आकडेवारी पाहता, राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हिटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे.
10 मे रोजी मुंबईत केवळ 844 सक्रिय रुग्ण होते. 25 मे रोजी ही संख्या 1531 वरती पोहोचलेली आहे. शिवाय रुग्णदुपटीचा कालावधी निम्म्याने घटून 6453 दिवसांवरून 3973 दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.