संभाजीराजेंना शिवसेनेकडून राज्यसभेची ऑफर, पण ‘या’ अटी; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं? वाचा…

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील जागांचे गणित पाहिल्यास भाजप २ जागांवर आपले उमेदवार सहजपणे पाठवू शकतो. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका जागेवर आपला उमेदवार सहज राज्यसभेवर पाठवू शकतात. (sambhajiraje meet uddhav thackeray)

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काही सदस्य अतिरिक्त असल्याने दोघेही ६ जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असून उमेदवार उभे करणार आहेत. मात्र विद्यमान राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या संभाजीराजे राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले राज्यसभा सदस्य आहेत. संभाजी राजे यांनी सर्व पक्षांना आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात संभाजीराजे हेच प्रमुख चेहरा होते आणि आता त्यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादीकडे काही अतिरिक्त सदस्य असून ते संभाजीराजेंना पाठिंबा देऊ शकतात, असे ते म्हणाले होते. त्याचवेळी संभाजीरजेंना राज्यसभेवर पाठवणाऱ्या भाजपने त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.

अशात संभाजीराजे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत शिवसेनेने काही अटी संभाजीराजेंसमोर मांडलेल्या आहे. तर संभाजीराजेंनी सुद्धा आपला प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर ठेवला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या अपक्ष बैठकीत संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र संभाजीराजेंनी प्रस्तावात काही सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. त्यांच्या या प्रस्तावावर विचार करुन कळवतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे . त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अखेर रद्द; ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय
आम्ही ३ मंदिरे मागितली होती, तुम्ही दिली नाही, आता.., ज्ञानवापीवर भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
सोनूसाठी सोनू आला धावून, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केले ‘हे’ कौतुकास्पद काम, म्हणाला…