राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शनिवारच्या सभेनंतर काल लगेच काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा झाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावातील नेस्को मैदानावर हिंदी भाषी महासंकल्प सभेमध्ये शिवसेनेवर जहरी शब्दांमध्ये टीका केली.
‘मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही तेजस्वी ओजस्वी ऐकायला मिळेल, असं वाटलं होतं. मात्र अख्खी सभा संपली पण लाफ्टर काही थांबेना. काल शंभर सभांची बाप सभा असेल, असं सेनेने सांगितलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांची सभा मास्टर सभा नव्हे ती तर लाफ्टर सभा होती, अशा खोचक शब्दात फडणवीस यांनी पलटवार केला.
काही दिवसांपूर्वी फडणवीस ‘मुंबई स्वतंत्र करू’ म्हणाले. मुंबई स्वतंत्र करू म्हणायला ती काय पारतंत्र्यात आहे का, असा सवाल सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. याबाबत ठाकरे म्हणाले, ‘मुंबईला तोडण्याचा यांचा मनसुबा वेळेत लक्षात घ्या. हे पोटातलं ओठात आलेलं वाक्य आहे,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना घेरले.
मात्र तुमच्या मालकांसह १७ पिढय़ा खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील, ती महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. याचाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.
‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिम्मत नाही. तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे, तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे, त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत लंका दहन होणार, मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकणार, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस म्हणतात, ‘रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता, असं म्हटलं तर किती मिर्ची लागली. मै तो अयोध्या जा रहा था, मै तो बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, अरे उद्धवजी, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करु? अशा शेलक्या शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना सणसणीत प्रत्युत्तर दिलं.