नवाब मलिकांना आणखी एक मोठा धक्का, ईडीने कारवाई करत आठ मालमत्ता केल्या जप्त

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झालेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिकांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. नवाब मलिक हे सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद आहेत. (ed sealed nawab malik property)

नवाब मलिकांना फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नवाब मलिकांच्या सॉलिड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांची मालमत्ता पीएमएलए कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये कुर्ला पश्चिम, मुंबई उपनगरातील आणि गोवा कंपाऊंड येथील व्यावसायिक मालमत्ता आहे. मालमत्तेत महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील १४७ एकर शेतजमीन, कुर्ला पश्चिम येथील तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. सर्वोच्च न्यायालय नवाब मलिक यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी विचार करणार आहे. या याचिकेत नवाब मलिक यांनी तुरुंगातून तात्काळ सुटका करावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे वकील कपिल सिब्बल यांनी पीएमएलए कायद्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाला या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद करताना ईडीने मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप केला होता.

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डमधील लोकांसोबत संबंध असून त्यांचा बेकायदेशीर कामातही सहभाग आहे, असे ईडीने तेव्हा न्यायालयाला सांगितले होते. नवाब मलिक यांनी टेरर फंडिंगचे गैरव्यवहार केले असून या प्रकरणी अधिक तपास करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांचे आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन समोर येईल, असे ईडीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
…त्यावेळी राज साहेबांनी माझी जात न बघता, मला…; सलीममामांनी सांगितला’तो’ किस्सा
पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती झाली उघड, सदावर्तेंच्या पत्नी फरार
युक्रेननंतर फिनलॅंडवर रशिया करणार आक्रमण, ‘या’ कारणामुळे संतापले पुतिन, पाठवले रशियन सैन्य