ST कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये उकळल्याप्रकरणी सदावर्ते विरोधात ४२० चा गुन्हा दाखल

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (akola police file against gunratna sadavarte)

याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने बुधवारपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली आहे. असे असताना गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील आणि अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोट शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विजय मालोकार असे फिर्यादीचे नाव आहे.

जानेवारी महिन्यात मालोकार यांनी अकोट पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. पण याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मागील ५ महिन्यांपासून बेकायदेशीरपणे संप सुरु केला आहे. या संपादरम्यान कर्मचारी पदाधिकारी हे वेगवेगळ्या लोकांमार्फत आर्थिक शोषण करुन कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

कर्मचारी आधीच संपामुळे व वेतन न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत असून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत आहे. याप्रकरणी तक्रार अकोट शहर पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र एसटी कामगार सेना संघटना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी सदावर्ते आणि अन्य तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विजय मालोकार यांनी केलेल्या तक्रारीनुसार, एसटी महामंडळात बेकायदेशीर पद्धतीने संपाची नोटीस देऊन संपाला सुरुवात झाली. संप काळात बहुंताश कर्मचाऱ्यांची राज्य शासनात विलीनीकरणाची इच्छा असल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी सदर संपामध्ये सहभागी झाले. त्यानंतर संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यास सुरुवात झाली.

तसेच कर्मचाऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत अजयकुमार गुजर आणि गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात हे प्रकरण दाखल केले होते. तसेच प्रशासनाद्वारे होत असलेली कारवाई रद्द करुन देतो, अशी खोटी आश्वासने देऊन कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ५०० रुपये जमा केले होते. राज्याभरातील ७० हजार कर्मचाऱ्यांकडून त्यांनी तब्बल ३ कोटी रुपये रक्कम जमा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आता याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील, अजयकुमार गुजर, प्रफुल्ल गावंडे यांच्याविरुद्ध भादवी ४२०, ३४ कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच सातारा पोलिस ठाण्यातही दोन वर्षांपूर्वी सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणीही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये लाटले; कर्मचाऱ्यानेच समोर आणले सत्य
कश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी तरूणांनो तलवारी बाळगा; साध्वीचे आवाहन
“मातोश्रीत बसलेल्यांनी सभेला लाखांची गर्दी जमवून दाखवावी” मनसेचं आदित्य ठाकरेंना जाहीर चॅलेंज