Share

उद्धव ठाकरेंभोवती ईडीने फास आवळला, मेहुण्याची कोट्यवधींची संपत्ती जप्त; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भावावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ईडीने ११ सदनिका जप्त केल्या आहेत.

ठाणे येथील निलांबरी प्रोजेक्टमधील या सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. तसेच ईडीने पुष्पक ग्रुपची तब्बल ६ कोटी ४५ लाखांची संपत्तीही जप्त केली आहे. पुष्पक ग्रुपवर कारवाई करताना श्रीधर पाटणकर यांच्या काही सदनिका ईडीच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.

हे प्रकरण पुष्पक बुलियन कंपनीशी संबंधित आहे. या प्रकरणात आतापर्यंत ईडीने केलेल्या कारवाईत ६.४५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याच कारवाईत ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ सदनिकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

या सदनिका साईबाबा ग्रुहनिर्माण म्हणजे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीच्या नावावर आहेत. आता या कारवाईनंतर असे समजले जात आहे की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ईडीच्या रडारवर आहेत. हे प्रकरण २०१७ सालचे आहे. त्यावेळी पुष्पक बुलीयन्स कंपनीवर ईडीने गुन्हा दाखल केला होता.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत पुष्पक बुलीयन्स कंपनीची तब्बल २१ कोटींची मालमत्ता याआधीच जप्त करण्यात आली आहे. ही संपत्ती महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीचे अनेक मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर होते पण आता मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकही ईडीच्या रडारवर आल्याने राजकारणात खळबळ माजली आहे.

थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवरच ईडीने कारवाई केल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. ईडीच्या या कारवाईवर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ईडीची कारवाई हा काही नवीन विषय राहिलेला नाही.

छगन भुजबळ यांच्यावरही हेतू पुरस्कर कारवाई करण्यात आली होती आणि सव्वा दोन वर्षांनी त्यांना हायकोर्टाने निर्दोष ठरवलं होतं. केंद्रातील भाजपचं सरकार हे ठरवून करत आहे. केंद्रातील तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न चालू आहे. हे महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, असं नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नितेश राणे म्हणाले की, जर मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकावर ईडीची रेड पडत असेल तर हा सरळ सरळ भ्रष्टाचारच आहे. मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
“राष्ट्रवादीच्या अशा फालतू नेत्याला भरचौकात फटके मारायला पाहिजेत”, शिवजयंतीवरून मनसे आक्रमक
देशातील प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाची धाड; २४ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु
झोमॅटोच्या १० मिनिटांत डिलिव्हरी सेवेवर रोहित पवार भडकले; म्हणाले, ‘मुलांच्या जीवाशी खेळ…’
विधानसभा निवडणूकीत दमदार कामगिरी अन् आमदाराला लागली राज्यसभेची लॉटरी; बनणार सर्वात तरुण सदस्य

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now