बिल गेट्स यांची आणखी एक भविष्यवाणी, जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार

जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही आणि जगाला आणखी एका महामारीचा धोका आहे. लवकरच कोरोनासारखी दुसरी महामारी येईल. त्यांच्या या इशाऱ्यामुळे लोकांमध्ये तणाव वाढला आहे.

सीएनबीसीशी संवाद साधताना, गेट्स यांनी नमूद केलं की, नवीन साथीचा रोग कोरोना व्हायरल गटातील नसून वेगळ्या रोगजनकांपासून तयार झालेला असेल. सध्या लस अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे कोविड-19 मधून जाणवणाऱ्या गंभीर आजारांचे धोके नाट्यमयरित्या कमी झाले आहेत.

गेट्स यांनी स्पष्टपणे सांगितलं की, या नवीन साथीच्या रोगाची सुरुवात एका वेगळ्या पॅथोजेनपासून होईल. भविष्यातील हा गंभीर रोग प्रामुख्याने लठ्ठपणा, मधुमेहाशी, वृध्दत्वाशी संबंधित असू शकतो. सध्या कोरोना संसर्गाच्या गोंधळांमुळे या समस्या नाट्यमयरीत्या कमी झाल्याचं चित्र आहे पण, भविष्यात येणाऱ्या नवीन महामारीमुळं या समस्या लक्षणीयरीत्या वाढू शकतात. असे बिल गेट्स यांनी यावेळी सांगितले.

जागतिक लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्तीची पातळी काही प्रमाणातच निर्माण झाल्यामुळे हे घडत आहे. नवीन ओमिक्रॉन वेरियंटमुळे व्हायरसची तीव्रताही आता कमी झाल्याचे दिसून आले आहे. व्हायरस पसरतो तेव्हा तो स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. पण आता जागतिक समुदायाची व्हायरसविरोधातील प्रतिकारशक्ती वाढल्याने ही सवय लसीपेक्षा अधिक प्रभावी ठरली आहे, असे गेट्स म्हणाले.

महामारी तज्ज्ञ एरिक फॅंग यांनी म्हटले आहे की, भारतात करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहेत. पण ओमिक्रॉनच्या BA.2 च्या सब-व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. करोना व्हायरसचा नवीन वेरियंट BA.2 ओमिक्रॉनपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा आहे.

तसेच म्हणाले, वेगवेगळ्या अभ्यासातून हे समोर आले आहे की, ओमिक्रॉनचा सब-वेरियंट BA.2 डेल्टा पेक्षा अधिक धोकादायक असू शकतो आणि त्यामुळे करोनाचा गंभीर आजार होऊ शकतो, या वेरियंटने चिंता वाढली आहे. दरम्यान, गेट्स यांनी यापूर्वी डिसेंबरमध्ये ओमिक्रॉन लाटेबाबत इशारा दिला होता.