महाराष्ट्रात लवकरच महापालिकांच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यातील राजकारण देखील चांगलेच ढवळले गेले आहे. मुख्य म्हणजे शिवसेना नेते गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील आरोप – प्रत्यारोपांची चर्चा सर्वत्रच रंगली आहे.
हे तिन्ही नेते सध्या एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता देखील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना “मी मुख्यमंत्री झालो नाही एवढंच बोंबलायचं, स्वत:च्या पुढे-मागे दोन गाड्या फिरवायच्या”, अशी जोरदार टीका गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.
गुलाबराव पाटील खडसेंवर टोलेबाजी करत म्हणले आहेत की, “मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणाऱ्या खान्देशाच्या नेत्याने लोककलावंताकडे दुर्लक्ष केले. खान्देशातील लोककलावंत असो की इतर समस्या याकडे दुर्लक्ष करत यांनी नुसतीच पदे मिळवली अन् पदे भोगली. मी मुख्यमंत्री झालो नाही एवढंच बोंबलायचं स्वत:च्या पुढेमागे दोन गाड्या फिरवायच्या.
मंत्री म्हणून मिरवायचं, एवढेच काम या लोकांनी केलं” तसेच, जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन व एकनाथराव खडसे असे दोन डाकू आहेत, असे मी बोललो होतो. डाकू म्हणजे बंदुका घेऊन निघालेले डाकू नाही. नाक खाजे, अन् नक्टी खिजे. यांना दुसरा धंदा काय? अशा शब्दात पाटील यांनी खडसे आणि महाजन यांच्यावर निशाना साधला आहे.
इतकेच नव्हे तर “जे लोक आमच्यावर बोलतात त्या लोकांना माझे हेच सांगणे आहे की, मी पालकमंत्री म्हणून शाळा कवच व जिल्ह्यात सातशे गावांपेक्षा जास्त गावांमध्ये पाणी पोहचवले” अशी टोलेबाजी पाटील यांनी या दोघांवर केली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपुर्वीच एका कार्यक्रमात बोलत असताना, माझ्या जिल्ह्यात एकनाथ खडसे सारखा डाकू असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्यांनतर या टिकेला उत्तर देत, गुलाबराव पाटील यांच्यासारखा उच्च शिक्षित, निर्व्यसनी आणि कार्यतत्पर अशा स्वरुपाचे मंत्रीमहोदय एकनाथ खडसे आमच्या जिल्ह्यात डाकू आहेत, असं म्हणतात.
मला वाटतं अशा निर्व्यसनी माणसाविरुद्ध न बोललेलं बरं. चोरो को सारे नजर आते है चोर, या पेक्षा अधिक प्रतिक्रिया माझ्याकडे नाही”, असे प्रतीउत्तर खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिले होते. त्यानंतर आज पुन्हा खडसे यांच्या वक्तव्यांवर गुलाबराव पाटील यांनी प्रतीक्रिया दिली आहे. या प्रतीक्रियेनंतर आता पुन्हा राष्ट्रवादीचे काय भुमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे.






