अभिमानास्पद! 16 वर्षीय तस्नीम मीरने रचला इतिहास, बनली जगातील एक नंबरची बॅडमिंटनपटू

भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंच्या यादीत एक नवीन नाव जोडले गेले आहे. हे नाव 16 वर्षीय तस्नीम मीरचे आहे, जिने अंडर-19 BWF गर्ल्स सिंगल्समध्ये नंबर 1 रँक मिळवून इतिहास रचला. ती ज्युनियर स्तरावर जगातील नंबर 1 बॅडमिंटनपटू बनली आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला हे स्थान मिळवता आलेले नाही, त्यात पीव्ही सिंधू, सायना नेहवाल या दिग्गज खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.

पीव्ही सिंधू जेव्हा अंडर-19 मध्ये खेळायची तेव्हा तिलाही फक्त नंबर-2 क्रमांक मिळवता आला होता. गुजरातमधील मेहसाणा येथील तस्नीमने महिला एकेरीच्या ज्युनियर जागतिक क्रमवारीत 10,810 धावा केल्या. तस्नीम वयाच्या 7 व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळत आहे.

गुजरात पोलिसात कार्यरत असलेले तस्नीमचे वडील इरफान मीर हे देखील बॅडमिंटन प्रशिक्षक आणि माजी खेळाडू राहिले आहेत. त्यांनी तस्नीमची बॅडमिंटनशी ओळख करून दिली. तस्नीम म्हणाली, मी 7 वर्षांची असताना वडिलांसोबत बॅडमिंटन पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जात असे. सुरुवातीला मी गंमत म्हणून बॅडमिंटन खेळू लागले, नंतर मी खेळात चांगली झाल्याने वडिलांसोबत सराव करू लागले. ते माझे पहिले बॅडमिंटन पार्टनर होते आणि त्यांच्यासोबत माझा पहिला बॅडमिंटन सामनाही होता.

तिच्या यशाबद्दल तस्नीम म्हणाली की, ही बातमी ऐकून तिला धक्का बसला कारण तिने जगातील नंबर 1 खेळाडू होण्याचा विचारही केला नव्हता. तिने सांगितले की मागच्या वेळी तिचे रँकिंग 2 होते आणि तिला या वेळी देखील रँकिंग 2 मिळेल अशी अपेक्षा होती. पण स्पर्धेतून गुणांची भर पडल्यामुळे तिला रँकिंग-1 गाठता आले. तस्नीमच्या या यशावर तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत.

तस्नीमने सांगितले की, तिचे वडील तिच्या यशाने खूप खूश आहेत. खरतर मेहसाणा, गुजरात मध्ये अशी एकही व्यक्ती नाही ज्याला हा सन्मान मिळाला आहे, त्यामुळे माझ्या आई-वडिलांना आनंद तर आहेच पण माझा अभिमान देखील आहे कारण मी माझ्या मेहनतीने जागतिक क्रमवारीत नंबर 1 खेळाडू बनले आहे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्पर्धा करणे खूप कठीण आहे. आणि मी त्यासाठी खूप मेहनत घेतली.

तस्नीमच्या या यशाने गुजरात पोलीसही खूश आहेत. गुजरात पोलिसांचे डीजीपी आशिष भाटिया यांनी ट्विट करून तस्नीमचे अभिनंदन केले. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘बॅडमिंटनमध्ये ज्युनियर वर्ल्ड रँकिंगमध्ये प्रथम स्थान मिळवल्याबद्दल मेहसाणा पोलिस एएसआय इरफान मीर यांची मुलगी तस्नीम मीरचे अभिनंदन. अजून बरेच टप्पे गाठायचे आहेत.’ याशिवाय गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनराज नाथवानी आणि रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शन जरदोश यांनीही तस्नीमचे कौतुक केले.

तस्नीमचा प्रवास कधीच सोपा नव्हता. एक काळ असा होता की आर्थिक अडचणींमुळे वडिलांनी तस्नीमचा खेळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रायोजकत्वामुळे ती पुढे खेळू शकली. तस्नीम सध्या आसाम बॅडमिंटन अकादमीमध्ये स्टारलेट इंडोनेशियन प्रशिक्षक एडविन इरियावान यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत आहे. तस्नीमने यापूर्वी बल्गेरिया, फ्रान्स आणि बेल्जियममध्ये तीन विजेतेपद पटकावले होते.

वयाच्या 14 व्या वर्षी तिने अंडर-19 राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली. याशिवाय तिने 13 वर्षांखालील, 15 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतही विजेतेपद पटकावले. 2018 मध्ये, तिने हैदराबाद आणि नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय सब-ज्युनियर रँकिंग स्पर्धेत अंडर-15 एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपदही जिंकले आहे.

तस्नीम आता पुढील महिन्यात इराण आणि युगांडा येथे होणाऱ्या स्पर्धांसाठी तयारी करत आहे ज्यासाठी ती आता तिच्या क्रमवारीत सुधारणा करण्याचा विचार करत आहे. तस्नीमला वर्षाच्या अखेरीस टॉप 200 मध्ये येण्याची आशा आहे.