पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंजाब दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावं लागलं. त्यांचा दौरा रद्द करावा लागल्याने भाजपकडून काँग्रेसवर आणि पंजाबच्या सरकारवर निशाणा साधला गेला. मोदींच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न पंजाबकडून करण्यात आला, असा आरोप भाजपने केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला. भाजपच्या या आरोपांना प्रतिउत्तर देताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मैदानात उतरले आहेत.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी पटोले म्हणाले, पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी १५ दिवस आधीपासून सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे.
तसेच म्हणाले, कालच्या घटनेमध्ये पंजाबचे सरकार जबाबदार असल्याचे भासवून पुन्हा एकदा नौटंकीचा आधार घेऊन पाच राज्यांमध्ये निवडणुका जिंकता येतात का? असा प्रयत्न भाजपच्या वतीने चालला आहे का? खरंतर या घटनेच्या मागे गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाहीये ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या महागाईचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरीबांचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवरील लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी या पद्धतीने मोदी नौटंकी करत आहेत. असे यावेळी पटोले म्हणाले.
तसेच, यावेळी पटोले मोदींसोबत घडलेल्या प्रकरणात शेतकऱ्यांची बाजू घेताना दिसले. पटोले म्हणाले, मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. यालाच आता शेतकऱ्यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप नेत्यांनी आंदोलनजीवी म्हणून हिणवले, शेतकऱ्यांना आतंकवादी, दहशतवादी म्हणून डिवचले. परंतु, याचा सामना शेतकऱ्यांनी शांततेत केला. शेतकऱ्यांनी त्यांचा लढा सुरूच ठेवला. शेतकऱ्यांनी मोदींचा घमंड जिरवला आहे. त्यामुळे शेतकरी आता मोदींना सत्तेवरून पायउतार करून घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
नुकतेच नाना पटोले यांनी ट्विट करून काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले आहे, ‘प्रधानमंत्र्याच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.’ त्यांनी सोबतच यासंदर्भातील व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. तिथे पंतप्रधान फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे पंजाब दौरा पूर्ण न करताच पंतप्रधानांना दिल्लीला परतावे लागले होते. सध्या याच मुद्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप पाहताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
नोकरी सोडा आणि २५ हजारात सुरू करा हा व्यवसाय, दहमहा कमवा ३ लाख, सरकारही देतंय ५०% अनुदान
राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील ‘हा’ स्टॉक खरेदी करा, ICICI सिक्युरिटीजने दिला सल्ला
शेअर मार्केटमध्ये घसरण होऊनही टाटांच्या या शेअरने मारली मुसंडी, एका वर्षात १ लाखाचे झाले ३२ लाख