सध्या राज्यसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. राज्यसभा निवडणूकीची बिनविरोधी परंपरा गेल्या २४ वर्षांपासून सुरु होती. पण आता ती मोडीत काढत राज्यात निवडणूक लागली आहे. तीन जूनपर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार मागे न घेतल्याने ही निवडणूक लागली आहे.
सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अशात १९९८ राज्यसभा निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. त्या निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचा पराभव झाला होता.
राम प्रधान यांच्या पराभवामुळे तेव्हापासून सर्वच पक्षांनी आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी बिनविरोध निवडणूकीवर भर दिला आहे. परंतू आता २४ वर्षांनंतर पुन्हा घोडेबाजार होणार आहे. त्यामुळे यात नक्की कोणाचा पराभव होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
१९९८ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आरोप केले जातात. त्यांच्यामुळेच काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता, असे म्हटले जाते. १९९८ साली महाराष्ट्रातील ६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक झाली होती.
तसेच त्यावेळीही एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी ४२ मतांचा कोटा होता. काँग्रेसचे त्यावेळी ८० उमेदवार होते. मात्र इतर पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसचा दुसरा उमेदवार सहज निवडून येऊ शकणार होता. राज्यसभेच्या या निवडणूकीत काँग्रेसकडून नजमा हेपतुल्ला आणि राम प्रधान यांना तिकीट देण्यात आले.
तसेच त्यावेळी शिवसेनेने प्रितीश नंदी आणि सतिश प्रधान यांना तिकीट दिले. तर भाजपकडून प्रमोद महाजनांना तिकीट देण्यात आले होते आणि सुरेश कलमाडी आणि विजय दर्डा यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. थोडक्यात निवडणूकीत सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहिले होते, त्यामुळे एकाचा पराभव होणार हे निश्चित होते.
तसेच काँग्रेसकडे उमेदवार जिंकून येण्यासाठी पुरेसे पाठबळ होते. त्यामुळे त्यांचे दोन्ही उमेदवार निवडणून येणार हे स्पष्ट होते. मात्र त्यावेळी गुप्तमतदान पद्धती होती. त्यामुळे मतफुटीचा धोका होता. तिच भिती खरी ठरली आणि काँग्रेसच्या राम प्रधान यांचा पराभव झाला.
अपक्ष असलेले दोन्ही उमेदवार त्यावेळी जिंकले होते. त्यामुळे या निवडणूकीचे संपूर्ण खापर शरद पवारांवर फोडण्यात आले. राम प्रधान यांनी एका पुस्तकात आपण शरद पवारांमुळेच पडलो असे स्पष्ट लिहीले होते. शरद पवार यांनी अंतर्गत राजकारण करुन काँग्रेसच्या उमेदवाराला साथ न देता अपक्ष उमेदवाराला साथ दिली होती, असा आरोप राम प्रधान यांनी केला होता.
त्या निवडणूकीपासूनच गांधी विरुद्ध पवार या वादाला सुरुवात झाली होती. त्यावेळी सोनिया गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचा राजीनामा घेतला होता. तर १० आमदारांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावली होती. त्यानंतर काही महिन्यांतच शरद पवारांना पक्षातून काढण्यात आले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.
महत्वाच्या बातम्या-
‘मेजर’ पाहून शहीद संदीप उन्नीकृष्णनचे आई-वडील भावुक, अभिनेत्याला मिठी मारत सांगितली आठवण
अमित शहांनी घेतली सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबीयांची भेट, भावूक झाले सिद्धूचे वडील, म्हणाले..
महीलेचा पार्वतीचा अवतार असल्याचा दावा, महादेवासोबत लग्न करण्यासाठी उचलले मोठे पाऊल…