गेल्या कित्येक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवर्सन अखेर युद्धात झाले आहे. या युद्धाचा परिणाम सगळ्याच देशांवर होत असलेला पाहायला मिळत आहे. रशियाचा युक्रेनवर अमानुष हल्ला यावर अनेक देशांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशा परिस्थितीत युक्रेनच्या राष्ट्रपतींचे नेतृत्व पाहून सर्व थक्क होत आहेत.
रशियाने युक्रेन विरोधात युद्धाची घोषणा केली. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हवाई हल्ले होत आहेत. आज युद्धाचा चौथा दिवस आहे. दिवसेंदिवस युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या युध्दाच्या परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की याचं विशेष कौतूक केलं जातं आहे.
झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात आपण लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती बलाढ्य प्रतिस्पर्धी असलेल्या रशियाला जशास तसे उत्तर देण्याच्या इराद्याने पाऊलं उचलत आहेत. यूरोपीयन संघाची बैठक होण्यापूर्वी त्यांनी केलेले एक वक्तव्य सध्या त्यांच्या धाडसाचे उदाहरण देते.
त्यांनी यूरोपीयन संघाची बैठक होण्यापूर्वी एक वक्तव्य केले होते की, जीवाला धोका असला तरी घाबरणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने त्यांचे देशाचा उत्तम प्रतिनिधी म्ह्णून असणारे कर्तव्य, जबाबदारी याचे उदाहरण सर्वांना दिले.
तसेच रशियाने युक्रेन वर हमला केल्यानंतर युक्रेनची स्थिती पाहून अमेरिकेने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची ऑफरही दिली होती. पण ही ऑफर झेलेन्स्की यांनी नाकारत प्रतिस्पर्ध्यांशी लढण्यासाठी आम्हाला हवी ती मदत करा, असे आवाहन अमेरिकेला केले होते.
जनतेला संकटात टाकून दुसऱ्या कुठल्याही देशाचा आश्रय घेणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. तसेच रशियाने आक्रमण केल्यानंतर न डगतमगता त्यांचा सामना करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. खरं तर सध्या झेलस्की हे ज्या पद्धतीने बलाढ्य रशिया विरुद्ध उभे ठाकले आहेत ते नेता असावा तर असा याची झलक दाखून देणारे आहे.