राज्यात रोज काहीना काही नवीन घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच, एका युवकाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे.
परभणी येथील वसमत राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी परिसरात सोमवारी सायंकाळी ५ते ६ च्या दरम्यान एका युवकाने मुख्यमंत्री बदला अशी मागणी करत गोंधळ घातला. युवकाने ३० ते ४० फूट उंच कमानीवर चढून आगळावेगळा प्रकार केला आहे.
शहरात दाखल होणाऱ्या रस्त्यावर वसमत महामार्ग कमानीवर चढून एका युवकाने अर्धा तास गोंधळ घातला. युवकाच्या या गोंधळामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. या युवकाच्या गोंधळाने तेथील पोलीस यंत्रणा चांगलीच गोंधळात पडली.
https://drive.google.com/file/d/1XUynhRWPKGuXSAn_ovTZmzNdn6JuOl-S/view?usp=drivesdk
अखेर अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी युवकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकाने ३०ते ४०फूट कमानीवरून उडी मारली. कोणतेही कारण नसताना आणि काही मागणी सुद्धा नसताना युवकाने केलेल्या या प्रकारामुळे पोलीस, अग्निशमन तसेच उपस्थितही गोंधळात पडले.
शेवटी काही वेळ युवकाने मुख्यमंत्री बदलाची मागणी केल्याचे उपस्थित तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे यांच्यासह २० ते २५ पोलीस आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, या युवकाच्या गोंधळाचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केले जात होते. त्यामुळे ही चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्याची गर्दी महामार्गावर झाली. परिणामी, पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन राखत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे.