विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. राजकीय नेत्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळेच चित्रपटाबाबत आपली प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटामुळे अधिक राजकीय वाद उफाळला आहे. अशातच हा चित्रपट पाहून आल्यानंतर ‘ब्रेन स्ट्रोक’ होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. संबंधित तरुण ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून आल्यानंतर ‘ब्रेन स्ट्रोक’ म्हणजेच मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटून त्याचा मृत्यू झाला आहे. तरुण अवघ्या 38 वर्षांचा होता. हा घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, अभिजीत शशिकांत शिंदे असं मृत तरुणाचे नाव आहे. तो पिंपरी चिंचवड येथील लिंकरोड येथील रहिवासी आहे. संबंधित तरुण 21 मार्चला रात्री आपल्या मित्रांसोबत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. लहानपणापासूनच हिंदुत्ववादी संघटनांच्या विचाराने प्रेरित होता.
अभिजीत प्रचंड संवेदनशील होता. चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या मित्रात आणि त्याच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. चर्चेनंतर तो झोपण्यासाठी घरी गेला. मात्र 22 मार्चला पहाटे काळाने त्याच्यावर घात केला. 22 मार्चला पहाटे त्याला ‘ब्रेन स्ट्रोक’ आला. मेंदूत रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटल्याने तो बेशुद्ध झाला.
अभिजित रूम मधून बाहेर येत नसल्याने त्याचे आई वडील पाहण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेले. हाक मारून देखील तो उठत नसल्याने त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार सुरु असताना 27 मार्चला रविवारी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, चित्रपट पाहिल्यामुळेच अभिजितला ब्रेन स्ट्रोक झाला असं म्हणता येणार नाही.
डॉक्टरांच्या मते कोणत्याही घटनेमुळे रक्तदाब वाढू शकतो. शिवाय सकाळी झोपेत रक्तदाब कमी अधिक होत असतो. अभिजितला ब्रेन स्ट्रोक नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही, मात्र, रात्री ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहिल्यामुळेच त्याच्यासोबत हा अनर्थ घडल्याचं बोललं जात आहे.