पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची काल जयंती होती. जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची पोलिसांनी अडवणूक केली. यावर पडळकर यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.
चौंडीत जाण्यापासून गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला गेल्याने काल परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना पवार यांच्यावर टीका केली. म्हणाले, रोहित पवारांच्या अगोदर २९ मे रोजी अहिल्यादेवी होळकर कार्यक्रमासाठी मी परवानगी मागितली होती. पण रोहित पवारांना माझ्या अगोदर परवानगी दिली.
रोहित पवारांच्या बापाने कायदा लिहिलाय का? असा सवाल करत गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. म्हणाले, पोलीसबळाचा शरद पवार वापर करत आहेत. अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त तुम्ही आज किती चुकीच्या पद्धतीने वागताय, हे सर्व महाराष्ट्रातील लोक पाहत आहेत. तुमच्यात धमक असेल तर समोरासमोर सभा भरवा असे आवाहन पडळकरांनी शरद पवार यांना दिले.
याआधी कधी राष्ट्रवादीच्या नावे जयंती झाली नाही. सर्वसमावेश जयंती साजरी होती. याआधी रोहित पवारांना आणि त्यांच्या आजोबांना चौंडी का दिसली नाही? जयंतीला का आला नाहीत? का दर्शनासाठी येथे आला नाहीत? आता तुम्हाला राजकारण करायचं आहे असे पडळकर म्हणाले.
तसेच म्हणाले, आमचं ऊर्जास्थान तयार झालेल्या चौंडी येथे तुम्हाला हल्ला करायचा आहे. आमचा इतिहास तुम्हाला बुजवायचा आहे. बहुजनांचे लचके तोडायचे आहेत म्हणून हा घाट घालता. शरद पवार आणि त्यांच्या नातवाने कार्यक्रमाला गालबोट का लावलं आहे? असा सवाल देखील यावेळी पडळकर यांनी केला.
पडळकर म्हणाले, त्यांचा बुरखा फाटण्यात आम्ही गेल्या दोन वर्षात यशस्वी झालो आहोत. त्यांना आता आपल्या लेकीची, नातवाची काळजी लागली आहे. पुढे लोक त्यांना जोडायचे आहे. आम्ही या महापुरुषासाठी काहीतरी करत आहोत असे दाखवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मी हिंदू आहे हे म्हातारपणी सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. असे म्हणत पवार कुटुंबीयांवर टीका केली.