नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये शिंदे गटातील संजय शिरसाट यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचं दिसत आहे. नुकतेच त्यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यामुळे ते उद्धव ठाकरे गटात जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे शिंदे समर्थक आमदारांच्या गटामध्ये खळबळ उडाली आहे.
शिवसेना आमदार बंड करुन गुवाहाटीला गेल्यानंतर संजय शिरसाट यांनी पत्र लिहून टीकास्त्र सोडलं होतं. मात्र, गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणारे आणि आज उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणणारे संजय शिरसाट हेच का असा सवाल उपस्थित होतं आहे.
संजय शिरसाट यांनी जे ट्विट केलं होतं त्यात ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा करण्यात आला होता. याशिवाय त्यांच्या विधानसभेतलं एक भाषणही त्यांनी शेयर केलं होतं. परंतु काही वेळातच त्यांनी ते ट्विट डिलीट केलं, त्यामुळं आता मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा शिवसेनेत जाणार, असा इशाराच शिरसाटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्याची चर्चा आहे.
ठाकरेंचं कौतुक करणारं ट्विट केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार शिरसाट म्हणाले की, आम्ही आजही शिवसेनाच आहोत, आमचा नेता हा आमचा कुटुंबप्रमुख असतो, उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत, आमची त्यांच्यावर नाराजी असली तरी आम्ही त्यांच्याविरोधात बोलू शकत नाही.
उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती, परंतु ते आजही आमचे कुटुंबप्रमुखच असल्याचं शिरसाट म्हणाले, तसेच मंत्रिपद न मिळाल्याच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, मी एखाद्यावर विश्वास ठेवला तर मान कापली गेली तरी हरकत नाही, मंत्रिपदासाठी मी भूकेला नाही. परंतु ज्या ठिकाणी चुकतं त्या ठिकाणी बोलायला हवं, मी स्पष्टपणे बोलतो.