राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत एकेका मतांसाठी रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात दिसत आहे. अशावेळी महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.
डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवल्यामुळे आता निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्वाला काहीसा दिलासा मिळाला असेच म्हणावे लागेल. राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीला माकपने सत्ता स्थापनेच्या वेळी पाठिंबा दिला होता.
आता देखील राज्य सभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला माकपने पाठिंबा दिला असे निकोले यांनी सांगितले. सध्या, राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी लॉबिंग करण्यात येत आहे.
एका एका आमदाराला आपल्या बाजूकडे वळविण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप या पक्षाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच डहाणूचे निकोले यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेला दिलासा देणारा ठरला आहे.
दरम्यान, बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाबाबत सावध भूमिका घेतली, आणि आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू असे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला. त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्या पाठोपाठ सपाच्या अबू आझमी यांनी देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतला.
मतदानाचा दिवस जवळ येत असताना आघाडीसाठी हे दोन्ही धक्के पचणारे नाहीत. हितेंद्र ठाकूर यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी नुकतेच शिवसेनेच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. ठाकूर यांना पाठिंब्यासाठी विनंती केली होती. पुढे काय होते हे पाहणं गरजेचे ठरेल.