काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर आता महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या कोट्यात १८ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्री पदासह २८ मंत्री असणार आहे. तर शिंदे गटाला ६ कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दर ६ आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्री पद दिले जाऊ शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, खाते वाटपाचे हे सूत्र मात्र अद्याप पक्के झाले नाही किंवा ठाम नाही. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार २८ मंत्रीपदे मिळणार आहेत. तर यांच्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार भाजप आणि एकनाथ शिंदे गटात राज्यमंत्री पदावर, नितेश राणे,गोपीचंद पडळकर,निलय नाईक,महेश लांडगे आणि राहुल कुल, मदन येरावार, प्रशांत ठाकूर यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाकडून, संजय शिरसाठ,भरत गोगावले,आणि संदीपान भुमरे यांची वर्णी लागू शकते.
तर कॅबिनेट मंत्री म्हणून शिंदे गटातून दीपक केसरकर, तानाजी सावंत, बच्चू कडू, शंभूराज देसाई, संजय राठोड, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचं संभाव्य मंत्रिमंडळ हे खरं ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. ‘भाजपसोबत मंत्रीपदांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका’ असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे गटाच्या आमदारांसह राज्यातील जनतेला केलं आहे.