राज्यात खूप दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष, त्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना झालेली अटक, आणि नुकताच झालेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अशा सगळ्या घडामोडीनंतर काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे हे बडे नेते अजित पवार यांच्यासोबत मातोश्री वरती गेले. या भेटीत सुप्रीम कोर्टातली सुनावणी, मंत्रिमंडळ विस्तार तसेच आगामी अधिवेशन अशा विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी बंड केलं त्यामुळे उद्धव ठाकरे एकटे पडले. ठाकरेंचे अनेक जिवलग साथीदार त्यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत, बाळासाहेबांसोबतच्या जुन्या निष्ठावंतांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचा हात धरला.
ठाकरेंच्या या संकटाच्या काळात राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असताना किती चांगल्या पद्धतीने सरकार चालवलं, कोविड काळात त्यांनी त्यांच्या कामाने कसा ठसा उमटवला, हे सांगताना बंडखोरांचे आरोप किती वरवरचे आहेत, हे राष्ट्रवादीचे नेते नि:क्षून सांगत राहिले.
मात्र, आठवड्याभरापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना अटक झाली आणि राष्ट्रवादीचे नेते मौनात गेले. राऊतांची पाठराखण करायची, त्यांच्या मागे उभं राहण्याची वेळ आल्यावर राष्ट्रवादीने ठाम भूमिका घेतली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांची ‘चुप्पी’ बघून शिवसेनेने देखील आश्चर्य व्यक्त केलं.
यानंतर दैनिक ‘सामना’ मधून अग्रलेख लिहून शिवेसेनेने राष्ट्रवादीला खडे बोलही सुनावले. काँग्रेसचे कौतूक केले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जरासे नाराज असल्याची चर्चाही होती. पण कालच्या भेटीत सुप्रीम कोर्टातली सुनावणी, मंत्रिमंडळ विस्तार, आगामी अधिवेशन अशा विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.