मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा काल वांद्रे येथील बीकेसी मैदानावर झाला. बीकेसी मैदानावर तुफान गर्दी झाली होती. काल एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मोठा विश्वविक्रम झाला, अशी चर्चा सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी मंचावर शिंदे यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करत त्यांचा सत्कार केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याच्या मंचावर पोहोचताच वर्ल्ड बुक ऑफ लंडनच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला. दरम्यान त्यांच्या नावे असा कोणता विक्रम झाला आहे, असा प्रश्न आता शिवसैनिक आणि सर्वसामान्यांना पडला आहे.
तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्या निमित्ताने १२ फुटांची चांदीची तलवार भेट म्हणून दिली आहे. या तलवारीने विश्वविक्रम केला आहे. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मंचावर येत मुख्यमंत्र्यांना प्रशिस्तीपत्रक प्रदान करून त्यांचा सत्कार केला.
आजपर्यंतची ही सर्वात मोठी तलवार आहे. तसेच चांदीचा धनुष्यबाण, चांदीची गदा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५१ फुटी भव्य अशा तलवारीचे पूजन करण्यात आले.
दरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटात पक्षचिन्हावरून वाद सुरु आहे. हा वाद कोर्टात देखील पोहोचला होता. मात्र कोर्टाने निवडणूक आयोगाला यावर निर्णय देण्याचे अधिकार असल्याचे म्हटले होते. त्यात आता यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरु असताना धनुष्यबाण चिन्ह गोठवलेही जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. तसेच दुसरीकडे शिंदे गटाने नवीन चिन्हाबाबत तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता शिंदे आणि ठाकरे गटातील पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या वादावर काय निर्णय होईल पाहावं लागेल.