पती पत्नीचं नातं टिकण्यासाठी त्यांच्यातील शारीरिक संबंध देखील चांगलं असणं तितकंच आवश्यक असतं. मात्र काही वेळेस शारीरिक संबंध ठेवण्यास दोघांपैकी एकाची इच्छा नसते, किंवा काही अडचणी येतात, त्याचा परिणाम त्यांच्या रिलेशनशिपवरती पडताना दिसतो.
नुकतंच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. सर्वेक्षणामध्ये पुरुष आणि महिलांची विचारसरणी उघड झाली आहे. महिला या कोणत्या कारणामुळे पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देतात याबद्दल देखील माहिती मिळाली आहे.
एनएफएचएसच्या सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, देशातील ४५% स्त्रिया असं मानतात की, पत्नीने आपली कर्तव्यं नीट पार पाडली नाहीत तर कौटुंबिक हिंसाचार हा त्यांच्यासाठी वैध आहे. महिलांनी स्वतः अशी भूमिका मांडणं नक्कीच धक्कादायक आहे.
दरम्यान यामध्ये भारतात पत्नीने सेक्सला नकार दिला तेव्हा पतींना काय वाटतं, हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-५ मध्ये पुरुषांची विचारसरणी उघड केली आहे. यासाठी पुरुषांची मत घेतली आहेत.
सर्वेक्षणा दरम्यान ज्या पुरुषांची मतं घेतली त्यातील ६६ टक्के भारतीय पुरुषांचं मत आहे की, जर एखादी महिला थकली असेल तर ती तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देऊ शकते. तर दुसरीकडे सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या ८० टक्के महिलांचा असा विश्वास आहे की, महिला सेक्स नाकारू शकतात.
आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास महिला का नकार देतात याची काही कारणे देखील महिलांनी सांगितली आहेत. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये, ८० टक्के स्त्रिया म्हणतात की, त्या थकल्या असतात त्यामुळे पतीसोबत सेक्स करण्यास नकार देतात.
तसेच पतीला काही लैंगिक आजार असला तर त्या त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देतात. काही महिलांचे हे देखील म्हणणे आहे की, नवऱ्याचे जर दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध असतील तर त्यांना त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास आवडत नाही.