Share

‘अजितदादा नसते तर महाविकास आघाडी टिकली नसती’; राष्ट्रवादीच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना सुनावले

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. आजच्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून आपापल्या परीने विजयाची तयारी केली जात आहे. दरम्यान, खेड-आळंदीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी अजित पवार नसते, तर हे महाविकास आघाडी सरकार देखील टिकलं नसतं असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

आमदार मोहिते यांनी खेड तालुक्यातील प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या दिवशी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करत त्यांना मतदानास राजी केले. नाराज मोहिते यांनी माध्यमाशी बोलताना आपली नाराजी बोलून दाखवली.

मोहिते म्हणाले, गेली एक वर्षभर मंत्रालयात आमच्या खेड तालुक्यातील विकास कामांसदर्भातील फायली पडून आहेत. त्यात माझा काही दोष नाही, त्या काही माझ्या वैयक्तीक कामाच्या नाहीत. खेड तालुक्यातील पंचायत समिती, पोलिस ठाणे, प्रशासकीय इमारतींच्या संदर्भातील त्या फायली आहेत.

आमच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. आमच्या प्रकल्पांकडे, कामांकडे सरकारचं लक्ष नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. माहितीनुसार, त्यानंतर दिलीप मोहिते यांची ही नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून त्यांना आश्वासन देण्यात आलं.

तसेच मोहिते यांनी यावेळी ‘मतदान करतो मात्र कामं करा’ अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली आहे. मोहिते यांनी यावेळी माध्यमांना बोलताना मुख्यमंत्र्यांवर देखील टीका केली. म्हणाले, मुख्यमंत्री आम्हांला कधीच वेळ देत नाहीत. अजित पवार वगळता इतर कोणताही मंत्री आपल्याकडे लक्ष देत नाही.

आमचं राजकारणच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांनी सांगितले येथे बटण दाब की आम्ही ते बटन दाबणार. त्यांना मतदान कर, असे म्हटलं की आम्ही करणार आहे. त्यांनी सुद्धा माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, असे अजित पवार म्हणाले.

आमच्यासाख्या आमदारांचा अजित पवार विचार करतात. तर बाकीच्यांनी का करू नये. गेल्या दोन ते अडीच वर्षांत मंत्रालयात आल्यानंतर फक्त अजित पवारच असायचे. सगळ्या पक्षाचे आमदार त्यांना भेटून समस्या सांगायचे. ते सर्वांना मदत करण्याचे काम करायचे. कदाचित अजित पवार नसते, तर हे महाविकास आघाडी सरकारसुद्धा टिकलं नसतं, असे मोहिते म्हणाले.

राजकारण

Join WhatsApp

Join Now