तरुण तरुणी एकमेकांना प्रपोज करतानाच्या अनेक गोष्टी आपण याआधी ऐकल्या आहेत. कोणी गुलाब देऊन प्रपोज करते, कोणी कविता किंवा आपल्या वेगवेगळ्या कला वापरून आपल्या प्रियसीला प्रपोज करतात. मात्र आता एक अशी घटना समोर येत आहे, ज्यामध्ये तरुणाने तरुणीला एका भन्नाट पद्धतीने प्रपोज केले आहे.
ही घटना कोल्हापूर येथे घडली आहे. कोल्हापुरातील एका तरुणाने प्रियसीला लग्नाची मागणी ही थेट फ्लेक्स लावून केली आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात चर्चा आहे. प्रेमात पडलेल्या तरुणाचे नाव सौरभ कसबेकर आहे. तर तरुणीचे नाव उत्कर्षा आहे.
तरुणी सांगलीची आहे. या दोघांच्या प्रेमाची कहाणी कॉलेजमध्ये सुरू झाली. दोघेही बुधगाव-सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती.
मात्र, सौरभला ती आवडत होती. त्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर बोलणी करु. असे म्हटल्यानंतर त्याने तात्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असे सांगितले. सौरभच्या घरचे उत्कर्षाच्या घरी बोलणी करण्यासाठी गेले.
मात्र, उत्कर्षाच्या घरच्यांकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्यानं सौरभच्या मनात घालमेल सुरु झाली. त्यानं तिला लग्नासाठी अनोख्या पद्धतीनं प्रपोज करायचे असे ठरवले. त्यानुसार त्याने कोल्हापूर सांगली रोड वर एका फ्लेक्सद्वारे लग्नाची मागणी घातली. अशा अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली .
त्यानंतर उत्कर्षाच्या घरच्यांनी देखील सौरभचे तिच्यावरील प्रेम पाहून दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. दोन्ही घरातून लग्नाला परवानगी मिळाल्यानंतर होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. माहितीनुसार आता ते 27 मे रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.