मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत भोंग्यासंदर्भात भूमिका घेतली, तेव्हापासून राज ठाकरे अधिक चर्चेत आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेवर नाराज असणारे मनसे नेते वसंत मोरे सध्या त्यांच्या आणखी एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
जेव्हा पासून राज ठाकरे यांच्या भोंग्यासंदर्भातील भूमिकेला वसंत मोरेंनी नाराजी दर्शवली तेव्हा पासून सर्वांच्या नजरा वसंत मोरेंकडे लागून आहेत. वसंत मोरे हे नाराज असल्याची सर्वांना जाणीव आहे. त्यातच आता वसंत मोरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत त्यांनी “निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू ” श्रीमंतयोगी” असं कॅप्शनही दिलं आहे. या फोटोवर सध्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. अनेक मनसे कार्यकर्त्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना वसंत मोरे हे लवकरच मनसे सोडणार असे वाटत आहे.
अनेक मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली की, तात्या, काहीतरी चुकतंय, राजसाहेबांची साथ सोडू नका, जे कराल ते पक्षाच्या हिताचे असावे, साहेबांवर आणि पक्षावर संकट असताना त्यांना लढाईच्या मैदानात सोडून जाऊ नका, पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=553411579476549&id=100044231363898
तसेच काहींनी म्हटले की, चुकीचा संदेश जातोय तात्या, पक्षाच्या आंदोलनात तुमचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. तुमच्या असण्याने खूप मोठा आधार मिळतो. तुम्ही जे पण कराल ते पक्षाच्या हिताचे असावे. सगळं दिसतंय पुणे गटबाजी पण शेवटी पक्ष महत्वपूर्ण आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या भोंग्यासंदर्भातील भूमिकेवर वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत वसंत मोरे यांचं शहराध्यक्षपद काढून घेण्यात आलं. आपला कार्यकाळ संपल्याचं कारण यावेळी मोरेंनी दिलं. मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानेच पद गेल्याची चर्चा होती.