Share

Uddhav thackeray : भाजपला रोखण्यासाठी शिवसेना आणि MIM ची युती होणार का? जलील म्हणाले शिवसेना हिंदुत्वाच्या…

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले, आणि शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. शिवाय अनेक खासदार, आमदार हे शिंदे गटात गेले. उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली.

त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या चिन्हांवर दावा केला. शिंदे गटानं अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घ्यावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली. शिंदे गटाच्या अर्जानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं पहिल्यांदा शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं.

त्यानंतर दोन्ही गटांना नवीन नाव आणि नवं चिन्ह सूचवण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर, ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं.

या सर्व प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा अन्याय झाला अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता एमआयएम खासदार इम्तियाज जलील देखील दुखावले आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल प्रचंड वाईट वाटत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, शिवसेनेच्या फुटीचा केवळ राजकारण्यांवर परिणाम झाला नाही तर मराठी मनांवर त्याचा आघात झालाय. शिवसेनेमधलं हे बंड खरंच दुर्दैवी आहे. महाराष्ट्राने कधीही एवढ्या घाणेरड्या पातळीचं राजकारण पाहिलं नव्हतं, जे आज आपल्याला बघायला मिळतंय.

तसेच म्हणाले, राजकारण काहीही असू द्या, शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत आणि राहतीलही. मराठी अस्मिता शिवसेनेशी जोडलेली होती. मराठी माणसासाठी ढाल म्हणून शिवसेना कायम उभी होती. याच मराठी माणसाला फोडण्यासाठी आज भाजपकडून-अमित शाहांकडून जी परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे, खरंच त्याबद्दल मला वाईट वाटतं.

दरम्यान, येणाऱ्या काळात MIM आणि शिवसेना एकत्र येणार का? असा प्रश्न जलील यांना पत्रकारांनी विचारला असता म्हणाले, शिवसेना हिंदुत्वाच्या आधारावर उभी राहिली आहे. कुणाच्या मनात MIM-शिवसेना एकत्र येतील असं वाटत असेल तर ते शक्य नाही.

शिवसेना कुणासोबत जाऊ शकते पण आमच्यासोबत नाही. MIM ची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला मुस्लिमांची मते हवीत. नेतृत्व नको. मुस्लिमांनी मतदान करायचे पण नेते नको. त्यांना नेतृत्व नकोय. आम्ही राजकीय प्रवाहात आलो तेव्हा आम्ही नेतृत्व करू शकत नाही असं त्यांनी लोकांमध्ये सांगितले, असे जलील म्हणाले.

पण, आमचे खासदार, आमदार होऊ शकतात हे आम्ही दाखवून दिले. तुम्ही आमच्यासोबत बसू शकत नाही अशी मानसिकता इतर राजकीय पक्षात होती. ती MIM ने खोडून काढली अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी यावेळी दिली. जलील यांच्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now