दोन दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त करत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आपल्याला दुय्यय वागणूक दिली जात असल्याचं त्यांनी म्हटले. यावर आता भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
भारतीय जनता पार्टीच्या मुंबई कार्यालयात पत्रकारांशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधत असताना एक मोठा दावा केला आहे. म्हणाले, विकासकामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचे 90 टक्के आमदार नाराज आहेत, असा त्यांनी खळबळजनक दावा केला.
म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेसाठी तीनही पक्ष एकत्र आले. परंतु, त्यांच्यातील अंतर्गत वाद अजूनही कायम आहेत. शिवसेना व काँग्रेसच्या आमदारांची कामे खोळंबली असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.
तसेच म्हणाले, महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत 100 जागा निवडून येतील, असा अंदाज याच नाराजीच्या भरवशावर जाहीर केला. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजीच त्यांना फायद्याची ठरणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला माहिती असल्याचा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनात जाहीर झालेला अर्थसंकल्प केवळ कमिशन लाटण्याच्या हेतूने बनविण्यात आला होता. त्याचा सामान्यांना जराही फायदा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थसंकल्पातही स्वतःच्या पक्षातील आमदारांना खुश ठेवल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दावा केला होता की, शिवसेना केवळ मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी राज्यभरातील आमदारांची नाराजी ओढवून घेत आहे. त्यामुळे कधी ना कधी महाविकास आघाडीत स्फोट होईलच, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.