एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आंदोलन केलं आणि चपला फेकून मारल्या. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्याच्या गृहखात्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्वच जण टीका करीत आहेत. अशा वेळी राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा बदल होणार याची चर्चा सुरू आहे.
शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ वरती एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला. म्हणाले होते की, पवार यांच्या घरावर कर्मचारी जाणार हे वाहिन्यांच्या प्रतिनिधींना माहीत होते. मात्र, पोलिसांना याची माहिती का नव्हती?’
त्यामुळे आता झालेल्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याचं चित्र दिसत आहे. यातच अनेक चर्चांना सुरुवात झाली. म्हटले जात आहे की आता या प्रकरणामुळे राष्ट्रवादीत हे खाते जितेंद्र आव्हाड किंवा राजेश टोपे यांच्याकडे जाऊ शकते. दोघेही या पदासाठी सक्षम असल्याचं बोलले जात आहे.
दुसरीकडे सोशल मीडियावरून राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून मागणी केली जात आहे की, गृह खात्याचा कारभार अधिक आक्रमक मंत्र्याकडे द्यायला हवा. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांध्येही याबाबत जोरदार चर्चा आहे. त्यातच जितेंद्र आव्हाड हे कट्टर भाजपविरोधी असल्याने त्यांच्याकडेच हे खातं जावं अशी मागणी होत आहे.
हे खाते बदलले गेले तर या पदावर राजेश टोपे यांचे देखील नाव शरद पवार यांच्याकडून सांगितले जाऊ शकते, अशी देखील चर्चा होत आहे. मात्र, अद्याप खाते बदलाबाबत अधिकृत पातळीवर कोणतीही हालचाल नसल्याचेही अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेवर गृहमंत्री वळसे पाटील हेदेखील पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर कमालीचे नाराज असल्याचे दिसून आले. त्यांनी मुंबईचे आयुक्त संजय पांडे, कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे अत्यंत कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली, असे सांगितले जात आहे.