काल रशिया आणि युक्रेन दरम्यान प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी काल सकाळी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली, आणि रशियाकडून युक्रेनची राजधानी ‘कीव’ वर हल्ला चढवला. या हल्ल्यात युक्रेनचा एअरबेस आणि एअर डिफेन्स उद्ध्वस्त झाला. या वाढत जाणाऱ्या युद्धाला सध्या जगातील अनेक देश थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर आता चर्चा सुरू आहे.
सध्याच्या घडीला रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये पोहोचले आहेत. यापूर्वी आज कीववर सहा वेळा क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की असहाय्य दिसत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनीही हात वर केले आहेत. यावर झेलेन्स्की यांनी रशियासोबतच्या लढाईत एकटे पडल्याचे म्हटले आहे.
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील 137 लोक मारले गेले आणि 316 जण जखमी झाल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियन सैन्य सतत कीवच्या दिशेने पुढे जात आहे. सध्या रशियन सैन्य कीवपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे.
रशियाचे सैन्य ईशान्य आणि पूर्वेकडून युक्रेनची राजधानी कीव जवळ येत आहे. युक्रेनच्या सैन्याने कीवजवळील एक पूल उडवून दिला आहे. इव्हांकिवमधून येणाऱ्या रशियन रणगाड्यांना आत येण्यापासून रोखण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने हे केले आहे.
यावर आता युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. ताज्या माहितीनुसार, युक्रेनने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना चर्चेसाठी आमंत्रण पाठवले आहे. त्याचबरोबर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा केली आहे.
माहितीनुसार, युक्रेन रशियन सैन्य दारात पोहचल्यानंतर युक्रेनकडून रशियाशी चर्चेची तयारी दर्शवण्यात आलीय. ‘कीव्हच्या तटस्थतेवर आम्ही रशियाशी चर्चा करण्यास तयार आहोत, परंतु, सुरक्षेची हमी मिळावी’, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक यांनी म्हटलंय.
यावर रशिया ने प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे. रशिया च्या म्हणण्यानुसार युक्रेननं हत्यार टाकावं, मगच आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. आम्ही युक्रेनशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, मात्र आधी युक्रेनच्या लष्कराला युद्ध थांबवावं लागेल, असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लेवरोव्ह यांनी म्हटलंय. त्यामुळे आता पुढे यातून कोणता मार्ग निघेल याकडे सर्व जगाचे लक्ष आहे.