एकनाथ शिंदे यांनी बहुसंख्य आमदारांसह बंडखोरी करत अख्खी शिवसेना रिकामी केली. त्यानंतर भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. दरम्यान, सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यात भाजपच्या साथीत विधानसभेला २०० जागा जिंकून आणण्याची गर्जना केली.
मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली ही गर्जना कितपत योग्य ठरेल याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत, राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा होत आहेत. त्यात इंडिया टुडे- सी व्होटरच्या सर्व्हेत भाजप-शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात एकूण ४८ खासदार आहेत. २०१९ ची आकडेवारी पाहिली तर भाजपचे २३, शिवसेनेचे १८, राष्ट्रवादीचे ५, काँग्रेसचे १ आणि एमआयएमचा एक खासदार विजयी झाला. शिवसेना-भाजप युतीने ४१ जागा जिंकल्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादी युतीने ६ खासदार जिंकले.
परंतु सध्याचा विचार केला तर, आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले. तर सहा खासदार ठाकरे गटात आहेत. आता लोकसभा निवडणूक झाल्यास, शिंदे-भाजप गटाला केवळ १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. याचा अर्थ शिंदे-भाजप गटाला २३ हून जागांचं नुकसान होणार आहे.
या दोन्ही गटाच्या खासदारांची संख्या ३५ आहे. सर्व्हेनुसार यापैकी केवळ १८ खासदार विजयी होऊ शकतील. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवल्यास ते ३० जागा जिंकू शकतात. असा अंदाज या सर्व्हेतून वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या सर्व्हेवर शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शिंदे-भाजप गटाला केवळ १८ जागा मिळतील. त्यातही कमी होतील. ते ४५ चा आकडा सांगतात, अशी टीका देखील सावंत यांनी केली. यावर, आशिष शेलार म्हणाले, असे असेल तर सावंत यांनी स्वतः च्या जीवावर निवडून यावं.