काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजप यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू आहेत, एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करत असलेल्या अनेक घटना समोर आल्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसाठी ऑफर दिली आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांची बाजू घेत भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या अशी चर्चा आहे. त्यातच काल शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसाठी अजुनही दारं खुले असल्याचं म्हटलं आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटातील आमदारांना परत येण्याची दिलेली ऑफर शिंदे गटातील आमदार स्वीकारणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिवसेना नेता सचिन अहिर यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटातील आमदारांना ऑफर दिली आहे.
सचिन अहिर म्हणाले की, युतीमध्ये काय चाललं हे लवकरच कळेल. एकत्र येण्याची भूमिका घेणं आधीच कळल असत तर बर झालं असतं. आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्वा मान्य असेल तर त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे अजुनही खुले आहेत, असे अहिर म्हणाले.
अहिर यांनी शिंदे गट आणि भाजपमधील मतभेदांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, युतीमधील विसंगती हळुहळू समोर येत आहे. नितेश राणे बोलले आहेत. आणखी निलेश राणे यांची प्रतिक्रिया यायची आहे. सर्वकाही झालं की कळेल युतीत काय सुरू आहे असं अहिर यांनी नमूद केलं.
यावेळी अहिर यांनी मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही, यावरही टीका केली. म्हणाले, आता मंत्रालयाला मंत्रालय म्हणयचं की, सचिवालय असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात पुरस्थिती आहे. महिलांवर अत्याचार होत आहे. प्रशासनावर कुणाचा धाक राहिला नाही.
जीआरची अमंलबजावणी होत नाही. त्यासाठी मंत्री, पालकमंत्री लागतात. याचा अर्थ असा आहे की कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं असं सुरू आहे. अन्यथा जाहीर करावं की, आम्ही दोघेच सरकार चालवू, असे सचिन अहिर म्हणाले.