Share

मविआची साथ सोडून शिवसेना स्वबळावर लढणार? ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचे मोठे वक्तव्य

एकनाथ शिंदे बंड करून बहुसंख्य आमदारांसह जेव्हा गुवाहाटीला गेले, तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली होती. मात्र, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे ठाम राहिले आणि अखेर आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

सध्या शिवसेनेतील अनेक आमदारांसह खासदार देखील शिंदे गटात जात आहेत. शिवसेनेची अशी स्थिती असताना आदित्य ठाकरे शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. यावर आता शिवसेनेतील माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

अनंत गीते मागील काही दिवसांपासून कोकणातल्या राजकारणात सक्रिय नव्हते. पण, रत्नागिरी इथे आल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेने यापुढे सर्व निवडणूका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केली आहे.

अनंत गीते यांच्यासारख्या जुन्या जाणत्या, केंद्रीय मंत्री राहिलेल्या नेत्याने स्वबळाची मागणी केली आहे, त्यामुळे आता पक्ष नेतृत्व याबाबत काय प्रतिक्रिया देतील? पक्षातील इतर नेते त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, अनंत गीते यांना पत्रकारांनी प्रश्न केला की, शिंदे गटात गेलेल्या आमदारांची देखील तुमच्या सारखी स्वबळावर लढण्याची मागणी होती, मग त्यांचं काय चुकलं? यावर उत्तर देताना गीते म्हणाले, गद्दारांना याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आता गीते यांनी केलेल्या वक्तव्याची दखल शिवसेना प्रमुख घेणार का पाहावं लागेल.

तसेच म्हणाले, शिवसेना संकटात असताना पाठीशी राहणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. शिवसेनेची वर्गवारी करता येणार नाही. कायदेशीर बाबतीत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. सध्याची राजकीय स्थिती पाहता शिंदे गटाची दखल घेण्याची गरज नाही. गद्दारी माझ्या रक्तात नसून आजचे बंड भाजप पुरस्कृत आहे, असे गीते म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now