शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाराष्ट्र राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी ३९ आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यातच आता शिंदे गट मनसेत सामील होणार अशी चर्चा सुरू आहे.
शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात राजकीय नाट्याचा थरार सुरू झाला. एकनाथ शिंदे यांच्या गटात तब्बल ३९ शिवसेनेचे आमदार आहेत. दरम्यान, शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलिनीकरण करावे लागणार आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असं शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलं होतं.
पक्षांतरबंदी कारवाईपासून वाचवायचं असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते पण तो गट एखाद्या पक्षात विलिनीकरण करावा लागतो नाहीतर बहुमत असतानाही कारवाईला सामोरे जावं लागणार आहे, असे देखील शिवसेनेचे वकील म्हणाले होते.
त्यावर आता शिंदे गटाकडे दोन पर्याय असल्याचं बोललं जातं आहे. एक तर ते भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा प्रहार पक्षात प्रवेश करू शकतात. आता शिंदे गट मनसेत देखील सामील होऊ शकतो असे बोलले जात आहे. सध्या माध्यमांत देखील हीच बातमी पसरू लागली आहे.
यावर आता, शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, आम्हाला कोणत्याच गटात सामील होण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही शिवसेनेचा भाग आहोत. आमचा हा मूळ शिवसेनेचाच गट आहे पण जे उरलेले १४ आमदार आहेत त्यांनी कोणत्या गटात जायचं ते ठरवावं.
आम्हाला कोणत्याच पक्षात जायची गरज नाही आमचा मूळ पक्ष हा शिवसेनाच आहे. उरलेल्या १४ लोकांनीही आमच्याच गटात यावं, कारण आम्ही सगळे शिवसेनेला मानतो, ते आमच्याकडे आले तर त्यांना नक्कीच फायदा होईल. असे दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आम्ही सगळे मिळून शिवसेनेचाच वेगळा गट करण्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.