नुकतेच संभाजी राजे छत्रपती यांनी भाजपला रामराम ठोकत स्वतःच्या स्वतंत्र पक्षाची घोषणा करत राज्यसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले. दरम्यान, आता शिवसेनेने संभाजीराजेंना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ऑफर दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना राज्यसभेची सहावी जागा त्यांना दिली जाईल, अशी अंतर्गत चर्चा शिवसेनेत सुरू आहे. दरम्यान, राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी सर्वपक्षीयांनी मला मदत करावी, असं आवाहन मागील आठवड्यात संभाजीराजेंनी केलं होतं.
त्यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेने सुद्धा संभाजीराजे यांना राज्यसभेची सहावी जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, असे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सहा जागा निवडून द्यायच्या आहेत. यात भाजपच्या दोन तर शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काँग्रेस यांचा एक उमेदवार पहिल्या मतांच्या कोटा घेऊन निवडून येऊ शकतात. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांचा प्रयत्न होता. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली होती.
अपक्ष आमदारांनी आपल्याला सूचक आणि अनुमोदक म्हणून पुढे यावे, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाठिंबा दिल्याचा दावा त्यांच्या गोटातून करण्यात येत होता. आता मात्र तसे घडणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांना कोण पाठिंबा देणार, याची उत्सुकता आहे.
या निवडणुकीसाठी 42 मतांचा कोटा विजयासाठी ठरविण्यात आला आहे. भाजपचे दोन उमेदवार निवडून आल्यानंतर या पक्षाकडे अतिरिक्त 22 मते शिल्लक आहेत. याशिवाय अपक्षांची काही मते घेण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. अर्थात याबाबत भाजपने अधिकृत भूमिका जाहीर केली नाही, परंतु संभाजीराजे आणि पक्षातील नेत्यांचे यावर बोलणे झाले असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.