Share

राज आणि उद्धव एकत्र येणार? शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरामुळे चर्चेला उधाण

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंडखोरी करत भाजप सोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन झालं. या सर्व प्रकरणाचा शिवसेनेला मोठा धक्का बसला.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असे दोन गट पडले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला याचा मोठा धक्का बसला. अनेक स्तरातून उद्धव ठाकरे यांच्यासाठी सहानुभूती मिळू लागली, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी चर्चा सुरू झाली.

या चर्चेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? असा त्यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शर्मिला ठाकरे या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या की, “साद घातली तर येऊ देत.” त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेनेने पुढाकार घेतला तर ही युती होऊ शकते असाही विश्वास व्यक्त केला जात आहे. शर्मिला ठाकरे या माध्यमांशी संवाद साधत होत्या, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं असून, राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचं मोठं नुकसान झालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार घेऊन शिवसेनेला बंड करत राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता शिवसेना आपली संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे असं मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत होतं. या चर्चेविषयी विचारले असता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी, “त्यांनी साद घातली तर येऊ देत”असं विधान केलं.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now