भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना ‘पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केला तरी ते मला संपवू शकणार नाहीत’ असे विधान केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे या भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं होतं.
त्यातच आता पंकजा मुंडे यांनी रक्ताची नाते कधी संपत नसतात, असं मत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत केलं. यावरून पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत जातील या चर्चां अधिकच होऊ लागल्या. आता याबाबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने खुलासा केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे आगामी काळात राष्ट्रवादीत येणार का? यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. एकनाथ खडसे म्हणाले, ‘पंकजा मुंडे यांनी काहीतरी वक्तव्य केलं म्हणून सुतावरून स्वर्ग गाठण्याची गरज नाही. राजकारणात नातं जोपासलं पाहिजे. त्यामुळे यातूनच ओघवत्या शब्दात पंकजा मुंडे या बोलल्या असाव्यात,’ असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं.
दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना पाच ते दहा वर्षानंतर राजकारणातून निवृत्ती घेण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.
खडसे म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, ते विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. गेल्या काळात पक्षाने त्यांच्यावर मोठ मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र आता पक्षातलं वातावरण त्यांना आवडलं नसावं, त्यामुळे राजकारणापासून वेगळं होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल, असे खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देतील पाहावं लागेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे विविध मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया देताना आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत.






