Share

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एमआयएमला सामिल करून घेणार?

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय पाहता, महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षाला महाविकास आघाडीत सामील करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं चित्र दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपचा विजय झाला. गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर ही राज्ये भाजपने जिंकली. येत्या काळात महाराष्ट्र राज्यात देखील भाजप आपली जादू दाखवणार का अशी भीती विरोधकांना पडली.

अशावेळी, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरुन चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी, ‘घाबरण्याची गरज नाही आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही,’ असे युवा आमदारांना सांगितले.

त्यानंतर, राज्यात भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली होताना दिसत आहेत. राज्यात भाजपला रोखण्यासाठी तसेच मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षालाही महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये बैठक पार पडली.

यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एमआयएमचा निरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात येणार आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीनंतर आपली तिखट प्रतिक्रिया दिली

संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? तुम्ही विचारच कसा करू शकता? असा विचार करणंच एक आजार आहे, तसेच महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. चौथा त्यात येणार नाही. तीनच राहील, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पुढे एमआयएम पक्ष महाविकास आघाडीत सामील होणार का पाहावं लागेल.

राजकारण

Join WhatsApp

Join Now