पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभाग घेतला. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं, यावेळी बोलताना प्रल्हाद मोदी यांनी नरेंद्र मोदींवर भाष्य केलं आहे.
अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनच्यावतीनं आयोजित करण्यात आलेलं आंदोलन हे दिल्लीतील जंतर मंतरवर करण्यात आलं. या आंदोलनात प्रल्हाद मोदी सहभागी झाले होते. प्रल्हाद मोदी हे अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत.
या आंदोलनादरम्यान, फेडरेशनचे सचिव विश्वंभर बासू यांनी त्यांच्या ९ मागण्यांचं निवेदन यावेळी वाचून दाखवलं आहे. फेडरेशनच्या या मागण्यांचं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं जाणार आहे. तांदूळ, गहू, साखर आणि खाद्यतेल खराब होतं त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी फेडरेशनकडून करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रल्हाद मोदी यांनी सवाल केला की, माझा भाऊ पंतप्रधान असला म्हणून काय झालं, उपाशी मरु का? प्रल्हाद मोदी हे देखील एक रेशन दुकान चालवतात. माहितीनुसार, अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीनं आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
रेशन दुकानदारांना खाद्यतेल, डाळी आणि एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठा करण्यासाठी परवाने देण्यात यावेत, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांना धान्य पुरवठादारांशी करार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीनं देशभर रेशन वितरणासाठी पश्चिम बंगालचं मॉडेल राबवण्यात यावं, अशी मागणीही केली आहे. देशभरात रेशन विक्रीतून दुकानदारांना अल्प स्वरुपात रक्कम मिळते त्यामुळं त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होतात, त्यामुळं देशभरात जम्मू काश्मीरसह सर्व ठिकाणी दुकानदारांना अधिक रक्कम मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.