दापोलीत बंद असलेले साई रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडल्याच्या तक्रारीवरून ईडीने गुरुवारी राज्य मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थान, खासगी निवासस्थान आणि निकटवर्तीयांवर धाडी टाकल्या. यावर काल अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधत हे रिसॉर्ट आपले नसून सदानंद कदम यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. तसेच यात मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा कुठलाही संबंध नव्हता असे सांगितले.
यावरून आता शिवसेनेने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून सर्व वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परब यांना टार्गेट केले जात आहे. प्रश्न पर्यावरण आणि सांडपाण्याच्या बेकायदेशीर निचऱ्याचाच असेल तर कोरोना काळात गंगेत प्रेते वाहून गेली, यावर ईडी योगी आदित्यनाथ यांच्यावर छापे मारणार का? असा सवाल समानातून केला आहे.
या प्रकरणावर शिवसेनेने सामना अग्रलेखात लिहिले आहे की, आपल्या देशातील तपास यंत्रणा व न्यायव्यवस्थेवर जागतिक पातळीवर संशोधन करावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या रोज ‘ऐकावे ते नवलच!’ अशी इसापछाप प्रकरणे समोर येत आहेत.
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरी व मित्रपरिवाराकडे गुरुवारी सकाळपासून ‘ईडी’ नामक केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी छापेमारीच्या नावाखाली गेले. त्यांनी म्हणे परबांची 12 तास चौकशी केली. गेले काही दिवस नव्हे काही महिने दापोलीतील साई रेसॉर्टशी परबांचे नाव जोडले गेले.
पण, परब यांचा कागदोपत्री पक्क्या पुराव्यांसह दावा आहे की, संबंधित रिसॉर्टशी त्यांचा संबंध नाही. तरीही त्याविषयी ईडी, केंद्रीय पर्यावरण खात्यातून अनेक बाबतीत नियमभंग झाल्याचा बोभाटा करून परबांना टार्गेट केले जात आहे हे स्पष्ट दिसत आहे.
तसेच अग्रलेखात लिहिले की, परब यांच्या म्हणण्यानुसार संबंधित रिसॉर्ट त्यांचे नाही, त्याचा मालक सदानंद आहे आणि दुसरी गोष्ट हे रिसॉर्ट अद्याप सुरूच झाले नाही, मग सांडपाणी समुद्रात जाईलच कसं? रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात गेले यावर संशोधन करून ईडीने छापे मारले हे नवलच आहे.
प्रश्न पर्यावरण किंवा सांडपाण्याच्या बेकायदेशीर निचऱ्याचा असेल, तर ईडीने त्यांची विशेष शाखा गंगा- यमुनेच्या किनारी निर्माण करावी. कोरोना काळात गंगेत सांडपाणी नाही, तर सडकी प्रेते हजारोंनी वाहत होती. त्यामुळे गंगेच्या पर्यावरणाचा प्रचंड नाश झाला.
दापोलीतील रिसॉर्टच्या सांडपाण्यापेक्षा गंगेचे पूर्ण सांडपाणी त्या काळात झाले हा गंभीर गुन्हा पर्यावरणवादी ईडी किंवा सीबीआयच्या नजरेस का नाही आला. गंगेत प्रेते वाहू लागल्याने प्रदूषण झाले याबद्दल ईडी योगी आदित्यनाथ यांच्यावर छापे मारणार का? असा सवाल शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत.