जसजसे कुटुंब वाढत जाते, तसतसे त्यातील मतभेदही वाढतात, असे म्हंटले जाते. घरगुती हिंसाचार, भांडण जवळजवळ प्रत्येक कुटुंबात होतात. पण प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा असणाऱ्या एखाद्या कुटूंबात अशी घटना घडली तर, त्याची समाजात प्रचंड चर्चा होते. अशा प्रकारचे देशातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणजे अंबानी होय. त्यांच्या कुटूंबातील अशीच एक गोष्ट जगासमोर आली ज्याने चर्चेला प्रचंड उधाण आलं.
2002 मध्ये रिलायन्सचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 69 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. धीरुभाई अंबानी हयात असताना दोन्ही भावांमध्ये कोणताच वाद झाला नव्हता. पण, वडिलांच्या निधनानंतर मुकेश आणि अनिल यांच्यात खटके उडू लागले.
सतत होणाऱ्या मतभेदांमुळे या दोघांनीही आपली पदं वेगळी करुन घेतली. मुकेश अंबानींनी संचालक पद घेतलं, तर अनिल अंबानी उपसंचालक पद घेतलं. पण, हे सामंजस्य फार काळ टीकलं नाही. परवानगीशिवाय दुसऱ्य़ा भावाने कोणातही निर्णय घेऊ नये, असंच या दोघांना वाटत होतं. मात्र, हे धोरण जास्त दिवस टिकवता आलं नाही.
तडा तेव्हा गेला जेव्हा अनिल अंबानी यांनी पॉवर जनरेशन प्रोजेक्टची घोषणा केली. हा निर्णय मुकेश अंबानी यांना न विचारता घेतला. त्यामुळे दोन्ही भावात आधीच चाललेलं शीतयुद्ध वाढत गेलं. इथूनच वाद विकोपास गेला. मुकेश अंबानी आपल्याकडेच सर्व ताकद असल्याचं समजत होते, तर अनिल अंबानी स्वत:लाही त्याच ताकदीचे समजत होते.
अखेर 2004 नंतर अंबानी कुटूंबातील हा भावा-भावातील वाद अवघ्या जगासमोर आला. पुढील काही दिवसात कौटुंबीक व्यक्तींच्या मदतीनं संपूर्ण रिलायन्स समुहाची दोन्ही भावांमध्ये वाटणी करण्यात आली. त्या वेळी दोन्ही भाऊ, व्यवसायात एकसारख्याच टप्प्यावर होते. पण, आता मात्र त्यांच्यात असणारी दरी वाढली आहे.
मुकेश अंबानी आज उद्योग जगतात परमोच्च शिखरावर आहेत. तर, अनिल अंबानी त्यांच्या उद्योगात मात्र काहीसे ढासळल्याचं चित्र दिसत आहे. मुकेश अंबानी हे चीनच्या अलीबाबा समूहाचे मालक जॅक मा यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
मुकेश यांनी आपल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह रिलायन्स जिओ लॉन्च करून देशात इंटरनेट क्रांती आणली. 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये देखील सामील झाले. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश यांची वैयक्तिक संपत्ती बिलियन डॉलर च्या वर गेली आहे.
त्याचवेळी मोठा भाऊ मुकेश यांच्यापेक्षा अवघ्या दोन वर्षांनी लहान असलेले अनिल अंबानी अडचणींचा सामना करत आहेत. त्यांच्या काही व्यवसायांना कायदेशीर समस्या आणि निधीची कमतरता भेडसावत आहे. त्यांच्या कंपनीच्या शेअरची किंमत घसरत आहे.