अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यावर सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहेत. अशातच काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनीही यासंदर्भात भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
मुंबईतील अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेताना संस्कृती जपल्याचा बडेजाव मिरवणाऱ्या भाजपला कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडनिवडणूकीत ही संस्कृती जपल्याची भावना का सुचली नाही अशी विचारणा करत जयश्री यांनी भाजपविरोधी नाराजी व्यक्त केली.
भाजपविरोधी नाराजी व्यक्त करण्याचे कारण म्हणजे, आमदार जयश्री जाधव या मुळच्या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यांचे पती दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे देखील भाजपचेच कार्यकर्ते होते. परंतू ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ऐनवेळी त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवून विजय खेचून आणला .
चंद्रकांत जाधव यांचे पुढे दोन वर्षात निधन झाले. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसने पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. त्यावेळी जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून देऊन राज्याला चांगला संदेश देऊ असे आवाहन काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले होते.
परंतु भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्याचा पर्याय दिला. मात्र, जयश्री जाधव यांनी नकार दिला. त्यावर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली. सत्यजित कदम यांना जिंकवण्यासाठी राजकीय आणि आर्थिक ताकद पणाला लावली.
मात्र, या निवडणुकीत जयश्री जाधव यांना कोल्हापूरने आमदार केले. हीच पार्श्वभूमी आठवत सध्या जयश्री जाधव यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली, आणि म्हणाल्या, अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत भाजप संस्कृतीची भाषा करत आहे. मात्र त्यांचा यापूर्वीच्या निवडणूकीतला अनुभव तसा नाही, असे जयश्री म्हणाल्या.