Share

२००९ च्या लोकसभा निवडणूकीत छत्रपती संभाजीराजेंचा पराभव का झाला? जाणून घ्या खरी कारणे….

छत्रपती संभाजीराजे सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेमुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशावेळी अनेकांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीबद्दल चर्चा केल्या. छत्रपती संभाजीराजे यांना राजकारणात किती यशअपयश आले याबद्दल लोक मांडणी करू लागले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल सांगायचे झाल्यास, संभाजीराजेंना राजकारणात रस तर आहे, पण ते तत्व सोडून राजकारण करत नाहीत आणि इथेच त्यांच्या राजकारणाला ब्रेक लागतो. त्यामुळेच आता देखील शिवसेनेने प्रवेशाची ऑफर दिली तर त्यांनी आपले तत्त्व पुढे मांडले, आणि कोणत्याही पक्षात जायचं नाही या तत्वामुळे त्यांना अडथळा आला.

अशा अनेक घटना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आत्तापर्यंत झाल्या आहेत. कोल्हापूरच्या राजघराण्याला स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणाचाही इतिहास आहे. त्याप्रमाणे संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा दोन दशकांहून अधिक काळ कोल्हापूरच्या राजकारणाशी संबंधित आहेत. त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांनी 2004 ला कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवली. ते जिंकलेही होते.

यानंतर 2009 ला संभाजीराजेंना लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. पण या निवडणुकीत संभाजीराजेंचा पराभव झाला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून विजय देवने, तर सदाशिव मंडलिक हे अपक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी संभाजीराजे राजकारणात नवीन होते.

मात्र, यावेळी अनेक गोष्टी संभाजीराजेंच्या विरोधात घडत गेल्या संभाजीराजेंचा पराभव झाला. निवडणुकीत संभाजीराजेंच्या पराभवाचं पहिलं कारण म्हणजे त्यांचा सरळ स्वभाव. स्वकीयांनीच त्यांचा पराभव केल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. खरंतर या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माजी खासदार धनंजय महाडिक इच्छुक होते.

पण, त्यांना डावलून शरद पवारांनी संभाजीराजेंना उमेदवारी दिली. त्यामुळे धनंजय महाडिक हे जरी संभाजीराजेंच्या व्यासपीठावर उपस्थित असले तरी त्यांची सर्व यंत्रणा सदाशिवराव मंडलिक यांच्या मागे होती. त्यामुळे ही निवडणूक संभाजीराजे विरुद्ध सदाशिवराव मंडलिक अशी न होता सदाशिवराव मंडलिक विरुद्ध शरद पवार अशी झाली.

त्यातच शरद पवार यांनी सदाशिवराव मंडलिक यांना ‘म्हातारा बैल’ असे संबोधले आणि हे विधान सदाशिवराव मंडलिक यांच्या पथ्यावर पडलं. या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांनी संभाजीराजे यांच्यावर कोणतीही टीका केली नाही, मात्र मतदान शरद पवारांच्या विरोधात गेलं. असे अपयश पचवत अखेर 2016 ला संभाजीराजेंचं खासदार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. यावेळी तत्वनिष्ठ राजकारण आणि खासदारकी दोन्हीही एकाच वेळी त्यांना साध्य करता आलं.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now