एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळून शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. या सर्व प्रकरणात शिवसेनेला मोठा धक्का बसला , त्यानंतर शिवसेनेने शिंदें सरकारच्या एक ना एक हालचालीवर प्रखर टीका केली.
नुकतेच शिंदे फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ विस्तारासह खातेवाटप झालं. त्यावर आता सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. हिंदुत्वासाठी नाही तर मंत्रिपदासाठी आमदार शिंदे गटात केल्याचं सामना वृत्तपत्रांमधून सांगण्यात आलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात लिहिलं आहे की, ‘हिंदुत्वासाठी नव्हे तर मंत्रिपदासाठी ५० आमदार शिंदे गटात, एक गट बारा भानगडींचा फुकट मॅटिनी शो बघायला काय हरकत आहे?’असे लिहून सामना मधून शिंदेगटावर टीका करण्यात आली आहे.
जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रीपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति शिवसेना भवनातून प्रति-मंत्रीपदे देता येतील काय? प्रति-राज्यपाल एखाद्या प्रति-राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति शपथविधी करू शकतील काय?
राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झालाय. त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे? अशा शब्दांत सामनामधून शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. तसेच लिहिले आहे की, महाराष्ट्राच्या नशिबी जे भोग सध्या आले आहेत त्यातून मार्ग कसा काढावा याच विवंचनेत मराठी जनता आहे.
ईडी-पिडी’ बळाचा वापर करून राज्याच्या मानेवर चाळीस पिंपळांवरचा मुंजा बसविला. त्यामुळे सकाळी उठून पाहावे तर राज्यात एक नवी भानगड झालेली दिसते. यापैकी एकाही भानगडीशी शिवसेनेचा संबंध नाही. ३८ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले आणि त्यानंतर खातेवाटपही रडतखडत झाले.
लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागले. खातेवाटपही अगदी नमुनेदार झाल्याने शिंदे गटात त्यावरूनही एखाद्या भानगडीची ठिणगी न पडली तरच नवल. नगर विकासाचे मलिदा खाते सोडले तर शिंदे गटाच्या हाती भाजपने भोपळाच दिला आहे, असे सामानाच्या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.