Mahesh savant : सदा सरवणकरांचे कट्टर समर्थक मानले जाणारे महेश सावंतच शिंदे गटाच्या निशाण्यावर का? ‘हे’ आहे कारण

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप वाढले. त्यात दादरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला.

शिंदे आणि ठाकरे गटातील या वादाने राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या राड्यात ठाकरे गटाचे महेश सावंत चर्चेत आले. त्यांचे चर्चेत येण्याचे नेमके कारण काय? तसेच शिंदे विरुद्ध ठाकरे गटात झालेल्या त्या राड्यात त्यांचा नेमका रोल काय याबद्दल माहिती घेऊ.

तर, महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. पण, २००९ साली सदा सरवणकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. नारायण राणेंसोबत काँग्रेसचा हात पकडला. सदा सरवणकर यांच्यासोबत महेश सावंतही गेले.

काही वर्षांनी सदा सरवणकर हे शिवसेनेत आल्यानंतर महेश सावंत देखील सेनेत परतले. ठाकरे सरकार पडल्यानंतर मात्र, सरवणकर यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात गेले. पण, महेश सावंत ठाकरेंसोबत उभे राहिले. सरवणकर यांचे कट्टर असूनही ते ठाकरे गटात राहिल्याने त्यांचे कौतूक करण्यात आले.

सदा सरवणकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने सावंतांना विभागप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यात, प्रभादेवीत गणेश विसर्जनादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यात विभागप्रमुख महेश सावंत हे शिंदे गटाच्या निशाण्यावर असल्याचे दिसून आले.

या सर्व राड्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे झालेल्या राड्यात महेश सावंत चर्चेत आले. २०१७ ला महापालिका निवडणुकीत सावंत यांना डावललं गेलं होतं, मात्र आता या राड्यानंतर चर्चेत आलेले सावंत आगामी निवडणुकीत दिसतील अशी चर्चा सुरू आहे.