नुकताच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या विजयी झाल्या. मात्र यांना विजयी करण्यामागे असणाऱ्या मास्टर माइंड नेत्याची म्हणजेच बंटी पाटील यांची सध्या कोल्हापूरात चर्चा होत आहे. काँग्रेसचा एवढा अनुभवी नेता अजून राज्यमंत्रीच का असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
कोल्हापूर मध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांनी भाजपला टक्कर देत काँग्रेसला निवडून आणले. त्यामुळे त्यांच्या राजकीय रणनीतीची सध्या चर्चा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत बोलताना म्हटलं होतं की, सतेज पाटील यांची वयाची 50 उलटली तरी काँग्रेसकडून अजून राज्यमंत्रीच का ठेवलं जातं आहे? असा प्रश्न केला होता.
कोल्हापूर निवडणुकीनंतर आता हाच प्रश्न सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना देखील पडला असून सतेज पाटील हे कॅबिनेट मंत्री झाले पाहिजेत अशी भावना ते व्यक्त करत आहेत. कार्यकर्त्यांची मागणी ही योग्य असल्याचं बोलले जात आहे. कारण, काही दिवसापूर्वी देशातील झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे वारे असतानाही सतेज यांनी कोल्हापुरातून विधानपरिषदेची निवडणूक आपल्या स्वतःच्या नेतृत्वावर बिनविरोध केली होती.
सतेज पाटील यांच्या राजकीय खेळीबद्दल बोलायचे झाल्यास, 2019 नंतर सर्वत्र भाजपचे वारे असताना, सतेज पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन स्वतः च्या हिमतीवर कोल्हापुरातून एक नाही दोन नाही तर काँग्रेसच्या तिकिटावर 4 आमदार निवडून आणले होते.
एवढच काय तर 2019 नंतर ज्या ज्या निवडणुकीत बंटी पाटलांनी आपलं टेक्निक वापरलं आहे, त्या त्या निवडणुकीत विजयाची पतका काँग्रेसच्या गळ्यात पडली आहे. गोकुळ दूध संघ असो, जिल्हा बँक असो किंवा विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून जाणं असो सतेज पाटलांनी एकहाती सत्ता सांभाळली आहे.
सतेज पाटील यांच्यामुळे आज कोल्हापूर सारख्या ठिकाणी काँग्रेस तग धरून उभा आहे. मात्र, काँग्रेस सतेज पाटील यांच्याकडे कधी लक्ष देणार हा प्रश्न निर्माण होत आहे. एवढे सारे होऊन देखील सतेज पाटील यांना काँग्रेसकडून फक्त राज्यमंत्री पदच बहाल करण्यात आले आहे. यावर आता चर्चा होत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेवर जे 44 आमदार आहेत त्यातील 4 आमदार हे एका कोल्हापुरातून त्यांनी निवडून आणले आहेत. त्यात सतेज पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर काँग्रेस बळकट करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न बंटी पाटलांकडून कधीच सुटले नाहीत.
म्हणूनच आज कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त आहे, तो भाजपमुक्त केला आहे तो काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांनीच. सतेज पाटील यांनी वयाची पन्नाशी गाठली, त्यामुळे त्यांना कॅबिनेट कधी मिळणार सतेज पाटील यांना काँग्रेस ताकद कधी देणार असा सवाल उपस्थित होत आहे.